ठाणे : इलेक्ट्रिक मोटारसायकलच्या बॅटरीतील स्फोटामुळे भिंत आणि पत्रे कोसळल्याने तिघे जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री ११ वाजता कळव्यातील शांतीनगर भागात घडली. जखमींना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मफतलाल कंपाऊंडमधील काली माता मंदिराजवळील सावित्रीदेवी वेल्फेअर सोसायटी या चाळीच्या रूम नं. ३१/२० मध्ये ठेवलेल्या इलेक्ट्रिक मोटारसायकलच्या बॅटरीचा स्फोट झाला. त्यामुळे रूम नं. ३१/२१ मधील लाल बादशहा यांच्या रूमची भिंत आणि पत्रे कोसळल्याची घटना १९ मार्चला रात्री १०:३० वाजता घडली. यात कुसुमदेवी विश्वनाथ गुप्ता (वय २८) यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली, तर लाल बादशाह (वय ६६ , रा. रूम नं. ३१/२१) यांच्या डोक्याला तसेच हातापायांना मार लागला.
मेहबुबी लाल बादशहा (५६, रा. रूम नं. ३१/२१) यांच्याही डोक्याला दुखापत झाली. घटनास्थळी दोन्ही रूमची कॉमन भिंत तसेच रूम नं. ३१/२० या रूमच्या छताचे पत्रे पडले असून, आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी मदतकार्य करून दोन्हीही रूम तात्पुरत्या बंद केल्या आहेत.