लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : विविध विकासात्मक घडामोडींत आघाडीवर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील बहुतांश गावपाड्यांमध्ये देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या पाऊणशे म्हणजे ७५ वर्षांत रस्ते, वीज, पाणी, आदी अत्यावश्यक सेवांचा आजही अभाव आहे. आजही शहापूर, मुरबाड, भिवंडी तालुक्यांतील तब्बल २३ गावांत वीज या अत्यावश्यक सेवेसह रस्ते नसून, ही गावे कोणत्याही जवळच्या रस्त्यांना जोडली नसल्याचे आढळून आले आहे. येथील रहिवाशांना आजही जंगलातील पायवाटांमधून रस्ता काढून शहर गाठावे लागत आहे.
ठाणे जिल्हा चार हजार चौरस किलोमीटर परिसरात विस्तारलेला आहे. यात ३१ शहरांसह ४३० ग्रामपंचायती आहेत. देशात सर्वाधिक सहा महापालिकांचा जिल्हा. यात दोन नगरपरिषदा, दोन नगरपंचायती, आदी स्थानिक स्वराज्य संस्था विकासात्मक दृष्टीने जिल्हा आघाडीवर आहेत. जिल्ह्यातील राजकीय घडामोडींचा परिणाम राज्यातील सत्ता, देशाच्या राजकारणाला, सत्तेला हादरा देणारा आहे. मात्र, आज या जिल्ह्यातील बहुतांश आदिवासी लोकवस्तीचे गावपाडे रस्त्यांसह वीज, पाणीपुरवठ्याच्या अत्यावश्यक सेवांपासून वंचित आहेत.
या गावपाड्यांना वीज, रस्ते व काही ठिकाणी पाण्याच्या अभावासह आरोग्य आणि वाहतूक सेवा तर या गावकऱ्यांच्या नशिबी आजपर्यंत नाही. देशाच्या ७५ वर्षांतील स्वातंत्र्यानंतर या सेवा व गरजा गावकरी, रहिवाशांचे स्वप्नच ठरल्या असल्याचे उघडकीस आले आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह महानगराला लागून ठाणे जिल्हा आहे. ऐतिहासिक कालखंडापासून ब्रिटिशांच्या सत्ताविस्ताराचा केंद्रबिंदू आणि आजही देशाच्या आणि राज्याच्या सत्तेवर अंकुश असलेल्या या जिल्ह्यातील गावपाडे त्यांना अत्यावश्यक सेवा व विकासाच्या वाटेवर घेऊन जाणाऱ्या रस्त्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत.
-------