ठाणे - सलग तीन दिवस कोसळणा-या पावसाने दिवा भागातील अनेकांचे संसार उघडय़ावर आले आहेत. आज तिस-या दिवशीही या भागात अनेकांच्या घरात पाणी होते. तब्बल 72 तासानंतरही या घरातील शेकडो घरांमध्ये पाणी असल्याने ते काढण्याची ताकदही रहिवाशांमध्ये नसल्याचे दिसत आहे. पालिकेच्या माध्यमातून रविवारी या भागातील सुमारे 8500 रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. मात्र उघडय़ावर पडलेला संसार परत कोण जोडणार असा सवाल आता येथील नागरीक करु लागले आहेत. शिवाय या भागात आरोग्य केंद्रच नसल्याने पुराचे पाणी ओसरले तरी आरोग्याचा गंभीर प्रश्न या भागात निर्माण होणार आहे. त्याचा सामना कसा करायचा हे सुध्दा कोडेच येथील रहिवाशांना पडले आहे.शुक्रवारी रात्री पासून ठाण्यासह जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. त्यामुळे अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचा सर्वाधिक फटका ठाणो महापालिका हद्दीतील दिवा या भागाला बसला आहे. दिव्यातील अनेक भागात शनिवार पासून पाणी शिरण्यास सुरवात झाली. त्यामुळे येथील साबेगाव, साळवी नगर, बी.आर. नगर, सिध्दीविनायक नगर, बेडेकर नगर, मुंब्रा देवी कॉलनी आदींसह इतर भागातील तब्बल शेकडो घरे पाण्याखाली गेल्याचे दिसून आले. रविवारी तर बारबी धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने आणि खाडीला भरती आल्याने दिव्यातील अनेक घरात पहिल्या मजल्यार्पयत पाणी होते. त्यानंतर पालिका, टीडीआरएफ, एनडीआरएफच्या मदतीने येथील सुमारे 8500 रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.दरम्यान सोमवारी पावसाने उसंत घेतली असली तरी या भागात पाणीच पाणी अशी परिस्थिती होती. अनेक शाळकरी मुलांच्या वह्या, पुस्तके, अभ्यासाचे साहित्य पाण्याखाली गेले होते. त्यामुळे ते सुकविण्याचे प्रयत्न पाल्य आणि पालकांकडून सुरु होते. कोणी घरातील पाणी बाहेर काढत होते, तर कोणी भिजलेला संसार पाहून डोळ्यातून अश्रु वाहत होता. तर कोणी अख्खा संसारच वाहुन गेल्याने दुखा:त होता. परंतु त्यांचे अश्रु पुसण्यासाठी कोणीही पुढे सरसावत नव्हता. दरम्यान दुसरीकडे स्थानिक समाजसेवकांच्या माध्यमातून या रहिवाशांना नाष्टा, जेवण आदींची व्यवस्था करण्यात आली होती. तर सकाळी या भागातून एनडीआरएफची टीम रवाना करण्यात आली. आता मात्र सांयकाळपासून पाणी ओसरु लागले असल्याने दिव्यात आता आरोग्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून या भागात फवारणी, गोळ्या, औषधांचे वाटप, मेडीकल कॅम्प घेण्यास सुरवात झाली असल्याची माहिती पालिकेने दिली. परंतु येथील रहिवाशांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणीही आता जोर धरु लागली आहे.
72 तासानंतरही दिव्यातील अनेक भागात पाणीच पाणी, अनेकांचे संसार आले उघड्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2019 5:30 PM