लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा : वसईच्या गौराईपाड्याच्या वाढाण इंडस्ट्रीत कामावर जाणाऱ्या २२ वर्षीय आरतीची प्रियकर रोहितने मंगळवारी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास भर रस्त्यात लोखंडी पान्याने १५ ते १६ वार करून निर्घृण हत्या केली. सहा वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. तरुणीच्या वागण्यावर रोहितला संशय होता. त्यांचा ब्रेकअप झाला होता. आरतीवर हल्ला होताना रस्त्यावरील लोक बघत होते. कोणीही या नराधम तरुणाला थांबविण्याचा प्रयत्न केला नाही. मदत करण्याऐवजी काहींनी या घटनेचे चित्रीकरण केले. त्याबद्दल संताप व्यक्त होत आहे. तिच्या वागण्यावर संशय असल्याने दोघांचा ब्रेकअप झाला होता. त्यातून रोहित रामनिवास यादव (वय २९) याने रागाच्या भरात आरती रामदुलार यादव (वय २२) हिची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आरोपीने आरतीच्या डोक्यावर मागून लोखंडी पान्याने हल्ला केल्यामुळे ती रस्त्यात कोसळली. त्यानंतर तो तिच्यावर वार करीतच होता. मृत्यू झाल्यानंतरही तो तिच्यावर वार करतच होता.
तो मृतदेहाजवळ राहिला बसूनआरती जमिनीवर कोसळल्यानंतरही माथेफिरू रोहित तिच्यावर वार करीत होता. हत्या केल्यानंतर तो मृतदेहाजवळच बसून होता. वालीव पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आरतीचा मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पोलिसांनी पाठविला आहे. वालीव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.
दोघांमध्ये अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्या मुलीला दुसरा मुलगा भेटल्याच्या संशयातून व रागाच्या भरात आरोपीने ही हत्या केल्याचीही माहिती मिळत आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे. - पौर्णिमा चौगुले-श्रींगी, पोलिस उपायुक्त, परिमंडळ-२
लोक बघ्याच्या भूमिकेत धक्कादायक म्हणजे, आरतीवर हल्ला होत असताना रस्त्यावरील अनेकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. रस्त्यावर लोक येत-जात होते. अनेक जण गाड्या उभ्या करून पाहत होते, तर काहींनी या घटनेचे चित्रीकरणही केलेे. एका तरुणाने रोहितला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने त्याच्याकडे लोखंडी पान्हा रोखल्याने तो मागे हटल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
...तर आरतीचा जीव वाचला असता
आरती यादव हिचा मोबाइल तिचा प्रियकर रोहित यादव याने ८ जून रोजी फोडला होता. त्यानंतर हा वाद आचोळा पोलिस ठाण्यात पोहोचला होता, मात्र, पोलिसांनी त्याच्यावर कारवाई न करता गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. त्यावेळीच योग्य कारवाई झाली असती तर आरतीचे प्राण वाचले असते, असा आरोप मृत आरतीची बहीण सानिका हिने केला आहे.
ही घटना अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आहे. मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तांना या घटनेसंदर्भात कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आरोपीला अटक करण्यात आली आहे. सखोल तपास करून न्यायालयातसुद्धा भक्कम पुराव्यानिशी बाजू मांडून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईल, या दृष्टीने निर्देश दिले आहेत.- देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री व उपमुख्यमंत्री
"आम्ही कारवाई सुरू केली होती"
८ जूनला रात्री नालासोपारा येथील शिर्डीनगर परिसरात आरतीचा मोबाइल रोहितने फोडला होता. नुकसान भरून दे, असा आग्रह तिने धरला होता. तेव्हा रोहितने नकार दिल्यावर हा वाद पोलिस ठाण्यात पोहोचला, पण दोघांमध्ये प्रेमप्रकरण असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले नाही. त्याच रात्री आरती बहिणीसोबत पावणेबारा वाजण्याच्या सुमारास आल्यावर तत्काळ गुन्हा दाखल केला होता. ९ जूनला सकाळी रोहितला बोलविण्यात आल्यावर तो हजर झाला होता. १२ वाजेच्या सुमारास आरती बहिणीसोबत पोलिस ठाण्यात आली. रोहितला पोलिसांनी खाक्या दाखविताच आरतीने पोलिसांना थांबविले. आमचे आम्ही मिटवून घेऊ, असे तिने सांगितले. तरी १४९ ची नोटीस देऊन कारवाई सुरू केली.- बाळासाहेब पवार,वरिष्ठ पोलिस निरीक्षक