ठाणे : कोरोना व्हायरसचा प्रार्दभाव रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने जांभळी नाक्यावरील मंडई सेंट्रल मैदान येथे स्थलांतरीत केली होती. मात्र येथेही सोशल डिस्टेन्टसचा नियम पाळला जात नसल्याने अखेर ही मंडई शुक्रवार पासून जांभळी नाक्यावरील तीन रस्त्यांवर भरविण्यास सुरवात झाली आहे. परंतु या ठिकाणी देखील नागरीकांकडून सोशल डिस्टेसींगचे जराही पालन होतांना दिसत नसल्याचे चित्र होते. त्यामुळे आता या गर्दी करायचे तरी काय असा प्रश्न पालिकेला सतावू लागला आहे. जांभळी नाका ते स्टेशन पर्यंत आणि जांभळी नाक्यावरील दोन भाजी मंडईत गर्दी ही कोरोनाला आमंत्रण देण्यासारखीच होती. त्यामुळे येथील ४०० भाजी विक्रेते आणि फळ विक्रेत्यांचे स्थलांतर पालिकेने बुधवार पासून सेंट्रल मैदानात केले होते. परंतु, बुधवारी काही प्रमाणात तेथे गर्दी दिसून आली. मात्र गुरुवारी या ठिकाणी नागरीकांनी सोशल डिस्टेन्टसचा कोणताही नियम पाळला नसल्याचेच दिसून आले. पोलिस आणि पालिकेचे अधिकारी आवाहन करुनही नागरीक याला हरताळ फासतांनाच दिसत होते. त्यामुळे आता काय करावे असा प्रश्न पालिकेला पडला होता. त्यानुसार गुरुवारी पुन्हा या संदर्भात बैठक घेऊन यावर दुसरा पर्याय पालिकेने पुढे आणला आहे. त्यानुसार जांभळी नाका भागातील तीन रस्ते आता यासाठी ठेवण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार आता येथील सुभाष पथ, शिवाजी पथ आणि चितांमणी चौकातील रस्ते यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पालिकेने गुरुवारी या तीनही रस्त्यांवर मार्कींग करण्याचे काम सुरु होते. त्यानंतर शुक्रवार पासून या रस्त्यांवर भाजी विक्री करण्यास सुरवात झाली. परंतु पहाटे पासूनच अनेक नागरीकांनी येथे गर्दी केल्याचे दिसून आले. पालिकेने मार्कींग केले असतांनाही सोशल डिस्टेसींगची ऐशी तैशी करण्यात आली होती. नागरीकांना येथे सुचनांचे पालन करा असे सांगितले जात असतांनाही त्याचे पालन होतांना दिसत नव्हते. दुसरीकडे आता कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असतांना नागरीकांना गरज असेल तरच घराबाहेर निघा असे आवाहन केले जात आहे. मात्र तरीही नागरीक मॉर्निंक वॉक किंवा अत्यावश्यक कारणे सांगून घराबाहेर पडून भाजी खरेदीसाठी गर्दी करतांना दिसत आहेत. त्यामुळे आता या गर्दीचे करायचे काय, असा सवाल उपस्थित झाला आहे.
फोटो - विशाल हळदे