डोंबिवली : पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतरही सलग चौथ्या दिवशी ‘नागूबाई निवास’च्या रहिवाशांना सोमवारही रस्त्यावरच काढावा लागला. या रहिवाशांच्या पर्यायी निवा-याची व्यवस्था व्हावी, याकरिता केडीएमसी प्रशासनासह महापौर राजेंद्र देवळेकरांनी दिवसभर प्रयत्न करूनही तांत्रिक मुद्यांची पूर्तता न झाल्याने बीएसयूपीच्या घरांमध्ये किंवा पांडुरंगवाडीच्या रात्रनिवारा केंद्रात सोमवारीही रहिवाशांना प्रवेश मिळाला नाही.‘ह’ प्रभाग अधिकारी अरुण वानखेडे हे दिवसभर इमारतीमधील सामान बाहेर काढण्यात व्यस्त होते, तर संध्याकाळनंतर मात्र त्यांनी पोकलेन लावून इमारत पाडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रहिवाशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. रहिवासी एकत्र आले व त्यांनी पालिकेच्या अधिका-यांना जाब विचारला. पालकमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे तात्पुरत्या निवा-याचे काय झाले? त्याची पूर्तता कधी होणार? इमारत पाडण्याआधी याची उत्तरे आम्हाला मिळायला हवी. त्याखेरीज, आम्ही इमारत जमीनदोस्त करू देणार नाही, असा पवित्रा रहिवाशांनी घेतल्याने तणाव वाढला होता. रहिवासी प्रसाद भानुशाली यांनी सांगितले की, पालकमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे सोमवारी सकाळी अधिकारी वानखेडे व नगरसेवक आमच्यासमवेत बसून पर्यायी निवा-याची पूर्तता करणार होते. मात्र, त्याचे नेमके काय झाले. ते संध्याकाळ झाली तरी आम्हाला कळले नाही. संध्याकाळी साडेपाचनंतर अचानक वानखेडे यांनी पोकलेन आणले आणि दोन मजल्यांवरील गॅलरी पाडल्या. अजूनही बहुतांश घरांमध्ये पंखे, दिवाण, कपाट असे सामान आहे. ते काढण्यापूर्वीच इमारत कशी पाडणार, असा आम्हा रहिवाशांना पडलेला सवाल आहे. पर्यायी निवाºयाची सोय झालेली नाही. घरांतील सर्व सामान बाहेर काढलेले नाही, अशा परिस्थिती आम्ही कारवाई करू देणार नाही, असे ते म्हणाले. सोमवारीही रस्त्यावरच राहावे लागणार असल्याने समस्या गंभीर होत असल्याची प्रतिक्रिया संजय पवार यांनी दिली.रहिवाशांच्या निवास दाखल्यांच्या प्रती मुख्यालयात दिल्या आहेत. आता त्यांच्या तात्पुरत्या निवाºयासंदर्भात मुख्यालयातील अधिकारी जो निर्णय घेतील, त्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करेन.- अरुण वानखेडे, ‘ह’ प्रभागक्षेत्र अधिकारी, केडीएमसीनागूबाई निवासमधील अत्यंत गरजू अशा रहिवाशांना तात्पुरता निवारा देण्यासाठी महापालिका स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी दिवसभर आयुक्तांसमवेत चर्चाही झाल्या. तांत्रिक बाबींमुळे अंतिम निर्णय झाला नसला, तरी दिलासा देण्याची प्रक्रिया सुरू आहे.- राजेंद्र देवळेकर,महापौर, कल्याण-डोंबिवली
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतरही ‘नागूूबाई’चे रहिवासी चार दिवस रस्त्यावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 5:22 AM