बदलापूर : बदलापूर पालिकेने शहरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पालिकेच्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास प्रशासनाकडून चालढकल सुरू आहे. सहा महिने झाले तरी अद्याप कॅमेरे बसवण्याच्या कामाला सुरूवात झालेली नाही.बदलापूरचे नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी शहरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाच्या अनुषंगाने पालिकेच्या अर्थसंकल्पातही तरतूद करून ठेवली होती. सरासरी १ कोटीपेक्षा जास्त निधी या कामासाठी ठेवला आहे. शहरातील चोरीच्या प्रकारात वाढ होत असताना पालिकेच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. मात्र आता या कामाला गती देण्यास प्रशासन कमी पडत आहे. पालिकेच्या सभेत नगरसेवकांनी या विषयाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता पालिका प्रशासनाने या संदर्भात कार्यवाही करुन ते काम अंतिम करणे गरजेचे आहे. मात्र सहा महिन्यात सीसीटीव्ही बसवण्याची फाईल पुढे सरकत नसल्याचे समोर आले आहे. शहराच्या सुरक्षेच्या हेतूने घेतलेला निर्णय हा योग्य असला तरी प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा फटका या निर्णयाला बसला आहे. आर्थिक आणि प्रशासकीय मंजुरी मिळालेली असतानाही ते काम सुरू होत नसल्याने आता शहरातून संताप व्यक्त होत आहे.
सहा महिने होऊनही सीसीटीव्हींचा पत्ता नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 2:14 AM