ठाणे : ठाण्यात गेल्या सहा वर्षांपासून केंद्राच्या अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या मलनि:सारण वाहिन्यांचे काम अद्यापही पूर्ण न झाल्याने केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांनी बुधवारी नियोजन भवन येथे झालेल्या दिशाच्या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. महापालिकेने आता काम पूर्ण होण्यासाठी डिसेंबरपर्यंतचा कालावधी जाईल, असे सांगितले. वास्तविक पाहता हे काम वेळेत पूर्ण अपेक्षित असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचेही त्यांनी या बैठकीत स्पष्ट केले.
बुधवारी झालेल्या जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा)च्या बैठकीत ठाणे शहरातील मलनि:सारण वाहिन्यांच्या कामांची पूर्तता कुठपर्यंत झाली याची माहिती पाटील यांनी मागविली. त्यावर ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी २०१५ मध्ये अमृत योजनेअंतर्गत ठाणे शहरात ६० कि.मी.चे मलनि:सारण वाहिन्या टाकण्याचे काम हाती घेतले असून यासाठी केंद्राचे ५७ कोटी, राज्य शासनाचे २८ कोटी आणि महापालिकेच्या निधीतून ६० कोटी रुपयांची तरतूद केल्याचे सांगितले. आतापर्यंत ६० कि.मी. पैकी ५६ कि.मी.चे काम पूर्ण झाले असल्याचा दावा करून उर्वरित ५ कि.मी.चे काम हे डिसेंबर अखेर पूर्ण केले जाईल, असेही सांगितले. पैकी एक कि.मी.च्या पाईपलाईनही टाकल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परंतु, सहा वर्षे उलटूनही अद्याप हे काम का पूर्ण झाले नाही, असा सवाल पाटील यांनी केला. महत्त्वाच्या कामांमध्ये ढिलाई कशासाठी असा प्रश्न करून यापुढील काम फास्ट ट्रॅकवर घेऊन पूर्ण करावे, असे आदेश ठाणे महापालिकेला दिले.
----------------------