ठाणे : नवीन कोपरी पुलावर तडे पडल्याप्रकरणी पुन्हा एकदा मनसेने मंगळवारी ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. या कोपरी ब्रीजचे ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केले असून एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास या घटनेची जबाबदारी पैसे खाल्लेले नेते, संबंधित अधिकारी आणि ठेकेदार घेणार का असा प्रश्न यावेळी मनसेने केला. नव्याने बांधलेल्या पुलामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला असून २५० कोटी खर्च केले असल्याचे ते म्हणाले.
यावेळी मनसैनिकांनी आघाडी सरकार हाय हायच्या घोषणा दिल्या. कोपरी ब्रिजच्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी, त्याला काळ्या यादीत टाकावे, संबंधित अधिकाऱ्यांचे तत्काळ निलंबन करावे अशी मागणी त्यांनी केली. या ब्रिजमागे ठाण्यातील बड्या नेत्याचा हात असल्याचा आरोप जाधव यांनी केला. हा मोठा नेता कोण असे विचारल्यावर जाधव यांनी पुढच्या वेळेस मी पुरावे घेऊन येतो, असे उत्तर दिले. कोपरी ब्रिजच्या निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच आयआयटीचा अहवालदेखील विरोधात आला असल्याचे मनसेने यावेळी म्हटले.