लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : गेल्या दीड वर्षानंतर शाळेची पहिली घंटा राज्यातील अन्य जिल्ह्यांत वाजली. पण मुंबई जवळ असलेल्या ठाणे जिल्ह्यात मात्र खबरदारीची उपाययोजना हाती घेऊन शिक्षकांचे दोन्ही डोस लसीकरण झाले असले तरी कोरोनाची अँटिजन टेस्ट करावी लागत आहे. त्याच ग्रामपंचायतींनी ठराव मंजूर करून पाठविल्यामुळे गुरुवारी पहिल्या दिवशी जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील इयत्ता आठवी ते बारावीच्या ३८५ शाळांची घंटा न वाजल्याने विद्यार्थ्यांच्या शाळेच्या पहिल्या दिवसाच्या आनंदावर पाणी फिरले.
‘कोरोनाच्या ब्रेक द चेन’ या उपक्रमातील तिसऱ्या स्तरात ठाणे जिल्ह्याचा समावेश आहे. त्यातही जागतिक दर्जाचे मुंबई महानगर लागून आहे. यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांच्या अँटिजन टेस्ट करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यास अनुसरून शिक्षकांनी एक किंवा दोन्ही डोस घेतलेले असले तरी त्यांना ती करण्यास सांगितले आहे. त्याचे नियोजनही करून जिल्ह्यातील शिक्षकांच्या टेस्ट केल्या जात असल्याचा दुजोरा शिक्षण विभागाने दिला आहे. मात्र, यामुळे पहिल्या दिवशी जिल्ह्यातील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळांची घंटा वाजली नाही.
ग्रामपंचायत व गावकऱ्यांची सहमती म्हणजे ना हरकत ठरावही शाळा सुरू करण्यासाठी लागणार आहे. ग्रामपंचायतीचे हे ठरावही आजपर्यंत शिक्षण विभागाकडे आलेले नाही. सरपंचांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाला ठराव देणार आहे. मात्र, आजपर्यंत एकही ठराव आलेला नसल्याचे निदर्शनात आले आहे. या ठरावास अनुसरून शासनाने शाळेची घंटा वाजण्याचा मार्ग मोकळा केला आहे. नाहरकत ठरावानंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ३८५ शाळांमधील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत.
कोरोनाला हद्दपार करण्यासाठी शहरांसह गावोगावी उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्ह्यातील काही गावे कोरोनामुक्त झाल्याचा दावा केला जात आहे. जिल्ह्यातील गावपाड्यांच्या ४३१ ग्रामपंचायतींपैकी ३५५ ग्रामपंचायती कोरोनामुक्त आहेत. यातील ३१४ ग्रामपंचायतींमध्ये गेल्या २८ दिवसांत एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे या कार्यक्षेत्रातील शाळा सुरू करण्यासाठी आता संधी आहे. पण एकही ठराव माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागास प्राप्त झालेला नसल्याचे निदर्शनात आले आहे.
--------
--------