ठाणे: पाचव्या टप्यात ठाणे लोकसभा मतदारसंघात आज मतदान झाले. यादरम्यान ठाणे विधानसभा मतदार संघामधील मतदान केंद्र क्रमांक २७३ मध्ये एक मतदार मतदान करणेसाठी गेले असता, त्यांचे ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीने मतदान केल्याचे केंद्राध्यक्ष यांचे निदर्शनास आले. त्यानंतर मात्र या मतदाराच्या ओळखीची खात्री करुन भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या मुळमतदाराने मतदानाचा अधिकार बजावला.
एका मतदाराच्या नावे जर दुसऱ्या व्यक्तीने मतदान केले असेल तर मूळ मतदाराच्या ओळखीची खात्री पटवून भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संबंधित मतदाराला प्रदत्त मतपत्रिका देवून त्यास मतदान करण्याची तरतूद उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार या ठाणे लोकसभा मतदारसंघातील या ठाणे विधानसभेच्या केंद्र क्रमांक २७३ वर झालेल्या प्रकारानंतर ओळखीची खात्री पटविल्यानंतर मूळ मतदाराने प्रदत्त मतपत्रिका भरुन मतदानाचा अधिकार बजावला आहे, असे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांनी सांगितले आहे.