ठाणे : दसरा मेळाव्यावरुन शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा वाद शिवसेनेत निर्माण झाला असताना आता आणखी एक वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. कारण, गणेशोत्सवात आमने सामने आलेल्या शिवसेनेतील उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या वादाचा दुसरा अंक आता ठाणेकरांना पाहायला मिळणार आहे. तर, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापूर्वीच नवरात्रीच्या निमित्ताने ठाण्यात एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिघे असा सामना रंगण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उद्धव ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष केदार दिघे यांनी पाट पूजन करुन मुख्यमंत्री शिंदेंना थेट आव्हान दिलं आहे.
ठाण्यातील टेंभी नाका येथील धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या नवरात्र उत्सवातील अंबे मातेची मूर्ती आजपासून घडवण्यास सुरुवात झाली. त्याच मूर्तीचा आज पाट पूजनाचा मुहूर्त होता. त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आधीच केदार दिघेंनी हजेरी लावली. त्यावेळी, नारळ फोडून पाटपूजनही केलं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पाट पूजन केलं. त्यामुळे, टेंभी नाका येथील नवरात्रौत्सव कोणाचा हा वाद आता उफाळून येत आहे. एकीकडे दसरा मेळावा कोणाचा हा वाद चर्चेत असताना, आता दिघेंनी नारळ फोडल्याने आणखी दुसरा वाद निर्माण झाला आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाण्यातील शिवसेनेमध्ये मोठी फुट पडली. त्यानंतर ठाण्यातील बालेकिल्ला वाचवण्यासाठी शिवसेनेने मोठा निर्णय घेतला. दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांची शिवसेनेच्या ठाणे जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती जाहीर केली. तर आनंद दिघे यांच्या सहकारी असलेल्या अनिता बिर्जे यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र, शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी ठाणे, पालघरमधून मोठी पाठिंबा मिळण्याची शक्यता शिवसेना नेत्यांनी गृहीत धरली होती. बंड चिघळल्यानंतर शिवसेना वाचवण्यासाठी अनेक जु्ने शिवसैनिक सक्रिय झाले आहेत.
राजन विचारे अन् दिघे एकत्र
ठाण्यात आनंद दिघे यांचे सहकारी राहिलेले खासदार राजन विचारे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. ठाण्यातील 67 पैकी 66 नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांनी केदार दिघे यांचे पक्षात पंख छाटले असल्याची चर्चा होती. त्यामुळे केदार दिघे हे काही काळ पक्ष कार्यापासून दूर होते असं सांगितलं जायचं. त्याशिवाय एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेले कार्यकर्तेदेखील पु्न्हा शिवसेनेत सक्रिय होत आहेत. त्यामुळे, केदार दिघेंना ताकद मिळाली असून मातोश्रीवरुनही त्यांना पाठबळ देण्यात येत आहे.