ठाणे : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पर्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यभरात संचारबंदी लागू केली आहे. मात्र, दुसऱ्या दिवशीही त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. गांभीर्य नसलेले ठाणेकर मॉर्निंग वॉकला उतरल्याचे दिसून आले. त्यांना समज देऊन पोलिसांनी घरी पाठवले. तर रेल्वेच्या तिकीट खिडकीवर आणि रेल्वेतही नेहमीप्रमाणे गर्दी हाेती. तर मार्केटमध्येही भाजी खरेदीसाठी गर्दी दिसत होती. दुसरीकडे पोलिसांचे लसीकरण सुरू झाल्याने नाकाबंदीतही काहीशी शिथिलता दिसली.
राज्य शासनाने पुढील १५ दिवस संचारबंदी लागू केली आहे. ठाणे महापालिकेनेही शहरात काय सुरू राहील, काय बंद राहील याची नियमावली जाहीर केली आहे. मात्र, दुसऱ्या दिवशीही संचारबंदीचा फारसा फरक पडल्याचे दिसले नाही. पहाटेच जांभळी नाक्यावर तलावाभोवती मॉर्निंग वॉकला नागरिक बाहेर पडल्याचे दिसून आले. पोलिसांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी या नागरिकांना समज देऊन घरी पाठविले. अशीच काहीशी परिस्थिती घोडबंदर भागातील हिरानंदानी इस्टेट भागातही हाेती. तेथेही मॉर्निंग वॉकसाठी नागरिक बाहेर पडले होते. दुसरीकडे, मार्केट परिसरही सुरू होता. बॅरिकेड्स लावण्यात आले असतानाही मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने भाजी खरेदी करण्यासाठी नागरिक जात होते. तसेच सार्वजनिक वाहतूक बस, रिक्षांतही गर्दी दिसत होती. त्यामुळे संचारबंदी आहे का, असा सवाल उपस्थित होत होता. दुसरीकडे रेल्वे तिकीट खिडकीवरही नेहमीप्रमाणे रांगा दिसत होत्या. रेल्वे स्थानकात आरपीएफ आणि जीआरपी प्रवाशांचे आय कार्ड किंवा क्यूआर कोड तपासताना दिसत नव्हते.
अत्यावश्यक सेवेच्या नावाने ये-जा
ठाणे शहरातील जांभळी नाका, स्टेशन परिसरातील मार्केटमध्ये अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने, भाजी मंडई सुरू असल्याने येथे सकाळी नागरिकांनी काही प्रमाणात गर्दी केल्याचे दिसत होते. या ठिकाणी पोलिसांच्या वतीने बॅरिकेड्स लावले होते. तरीही पळवाटा काढत काही नागरिक अत्यावश्यक सेवेचे कारण देत येथे ये-जा करत होते. शहरातील इतर ठिकाणीही नागरिकांची तुरळक वर्दळ दिसत होती. कळव्यातही भाजी मार्केट नेहमीप्रमाणे सुरू होते.