लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कोरोनाकाळात सर्व व्यवहार ठप्प झाल्याने ऑनलाइन व्यवसायांना, व्यवहारांना प्राधान्य देण्यात येत असले, तरीही धार्मिक पूजाअर्चा मात्र डोळसपणे गुरुजींच्या उपस्थितीत करण्यावर बहुतांश यजमानांचा भर असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यासाठी कोणताही गाजावाजा न करता शासन नियमानुसार श्राद्ध, सत्यनारायण पूजन, मंत्र जप, देवीकवच पठण, रुद्र, लग्न, मुंज यांसह विविध प्रकारच्या शांती, गृहप्रवेश, सीमंतीपूजन आदी करण्यासाठी प्रत्यक्ष गुरुजी येऊन साग्रसंगीत विधीवर भर दिला जात आहे. मोजक्या नातेवाइकांना बोलावून, पण शास्त्रोक्त, परंपरागत, संस्कृतीला धरून सर्व उपक्रम करण्याकडेच नागरिकांचा अद्याप कल दिसून येत आहे.
उच्चशिक्षित वर्गात अतिशय अल्प प्रमाणात ऑनलाइन विधीला प्राधान्य देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे कोविड पसरायला सुरुवात झाल्यानंतर काही महिने नागरिकांनी ऑनलाइनचा पर्याय वापरला. मात्र काही काळ असाही होता, की ज्यावेळी कोणतेच विधी न करता लोकांनी अनलॉकची प्रतीक्षा केली. अनेकांनी लग्न, मुंज, पूजा, शांती पुढे ढकलली. काहींनी अवघ्या पाच जणांच्या उपस्थितीत गुरुजींसमोरच पिंडदान, श्राद्धविधी पूर्ण केला.
------------
कुठले विधी होत आहेत ऑनलाईन
खरे तर ऑनलाइनला फार प्रतिसाद नव्हताच; पण ज्यांनी मार्ग निवडला त्यांनी लग्न सोडून अन्य सगळ्या पूजा केल्या. त्यात इंटरनेटचा अडथळा, मोबाइल हँग होणे, वीज खंडित होणे, सोपस्कार समजावून न सांगता येणे असे अडथळे आले. त्यामुळे मुहूर्त टळण्याचे प्रकार होऊ नयेत, यासाठी जे ऑनलाइन इच्छुक यजमान होते, त्यांचे विधीपेक्षा वेळेकडे जास्त लक्ष असल्याने यथासांग पूजा, समाधान मिळू शकले नाही, असेही सांगण्यात आले.
-------------------
पुजेला आले तरी मास्क
ऑफलाइन विधीलाच नागरिकांनी पसंती दिली. त्यामुळे यासाठी गुरुजी सोसायटीत, घराघरांत जाताना त्यांना नियम पाळावे लागत होते, गुरुजी स्वतःची सुरक्षा लक्षात घेऊन यजमानांना मास्क लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक शक्यतोवर पूजन होत असताना तिथे न येणे, धूप, उदबत्ती आदी धुरामुळे कोणाला श्वासाचा त्रास होत असल्यास त्यांनी पूजेच्या ठिकाणी न बसणे, सॅनिटायझरपेक्षा साबणाने हात स्वच्छ करणे, तसेच गरम पेय घेण्यावर गुरुजींचा भर दिसून आला. स्वतःचा पंचा, नॅपकिन किंवा यजमानांकडून पेपर नॅपकिन घेऊन काळजी घेतली गेली.
------------------
मुळात ऑनलाइन पूजाविधीचे प्रमाण कमी होते. कोविड असला तरी गुरुजींना घरीच बोलावून पूजा करण्यावर भर देण्यात आला होता. जे बाहेरगावी होते, किंवा ज्यांचे नातेवाईक परदेशी राहत होते अशा काहींनीच ऑनलाइन पूजेला प्राधान्य दिले; पण ते प्रमाण अल्प होते. त्यातही उच्चशिक्षित नागरिकांचा यात प्रामुख्याने समावेश होता.
ल. कृ.पारेकर, गुरुजी, डोंबिवली
----------------
कोविड काळातही प्रत्यक्ष पूजा करण्यासाठी बोलावणे येत होते. गणेशोत्सव काळातदेखील ऑनलाइन मागणी येईल असे वाटले होते; परंतु तसे झाले नाही. यजमानांनी घरी बोलावूनच गणेशाची पूजा करायला लावली. श्रावणातही तेच झाले. नवरात्रातदेखील घरोघरी बोलावणे होते. फक्त पूजेला नेहमीप्रमाणे गर्दी नसायची. अर्थात आम्हीदेखील नियम पाळूनच पूजाअर्चा केली. लग्नदेखील शासन नियमानुसारच असावेत याकडे गुरुजी म्हणून आम्ही उपस्थितांची संख्या निश्चित करूनच विधी पूर्ण केले.
विजयकुमार भगत, गुरुजी, डोंबिवली