ठाणे : आषाढ महिन्यात प्रत्येक नवविवाहिता काही दिवसांसाठी आपल्या माहेरी जात असते. परंतु, कोरोनामुळे आता तसे घडत नाही. माहेरच्या वाटेला नवविवाहितांचे डोळे लागले असले तरी कोरोनाने मात्र त्यांची वाट अडवली आहे.
आषाढ महिना आला की, रीतिरिवाजाप्रमाणे नवीन लग्न झालेली मुलगी माहेरपणाला येते. काही दिवस राहून आपल्या माहेरपणाचा आनंद ती घेत असते. परंतु, कोरोनाचे सावट आल्यामुळे याहीवर्षी मुलींना इच्छा असूनही माहेरी जाता आलेले नाही. काही गावांत तर बाहेरून येणाऱ्यांना बंदी केली आहे. दुसरीकडे तिच्या आईचेही मन भरून येत आहे. आईलाही मुलगी चार दिवसांसाठी माहेराला यावी, अशी इच्छा होत असते. कोरोनामुळे मात्र या इच्छेवर पाणी फेरले आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
--------------------------------
२२ मार्च रोजी लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे एप्रिल महिन्यात शून्य लग्न झाली. त्यानंतर बहुतांशी जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह करण्याला पसंती दिली. २०२० मध्ये ठाणे जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात मे ते डिसेंबर या कालावधीत १८८९ तर २०२१ मध्ये जानेवारी ते आतापर्यंत २७०० इतक्या जणांचा विवाह झाला.
--------------------------------
कोरोनामुळे आषाढ महिन्यात मला आईकडे राहता येत नव्हते. त्यामुळे एक दिवासासाठीच जावे लागले. गावातील आसपासचे लोक राहून देत नाहीत. त्यामुळे सकाळी जाऊन संध्याकाळी आले.
- हर्षदा चौघुले, नवविवाहिता
...........
माहेरी आल्यावर मुलीने चार दिवस राहावे ही प्रत्येक आईची इच्छा असते. परंतु, कोरोनामुळे ते शक्य नाही. वाईटही वाटत आहे.
- वर्षा अमोदकर, नवविवाहित मुलीची आई
...........
आषाढ महिन्यात मुली माहेरी येतात. परंतु, कोरोना असल्याने मी माहेरी गेलेली नाही. माहेरपणाची ओढ आहेच.
- श्रेया पाटील, नवविवाहिता
.......
मुलीची आठवण येते. नुकतेच लग्न झाले आहे, मुलीने माहेरपणाला यावे असे वाटते. परंतु, कोरोनामुळे ती येऊ शकत नाही. आम्हीदेखील कोरोनामुळे आग्रह धरू शकलो नाही.
- अरुणा गायकवाड, नवविवाहित मुलीची आई