टेम्प्लेट ११३४
अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : महावितरण कंपनीकडून नेहमी अधिकृत वीजजोडणी घेण्याचे आवाहन केले जाते. दुसऱ्याच्या घरातून व जागेतून वीजपुरवठा घेतल्यास घेणाऱ्याचा आणि ज्याच्याकडून घेतला त्याचा वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. तसेच ज्याच्याकडून वीजपुरवठा घेतला आहे, त्याला अनुमानित बिल दिले जाते. तसेच यापुढे असा प्रकार केला जाणार नाही, याबाबत हमी घेतली जाते.
विद्युत कायद्याच्या कलम १२६ मध्ये ज्या केसेस केल्या जातात, त्यांना विजेचा अनधिकृत वापर असे म्हणतात. एका वर्गवारीसाठी वीजपुरवठा घेऊन त्याचा वापर इतर वर्गवारीसाठी करणे, हेही कलम १२६ अन्वये बेकायदा ठरते. उदा. घरगुती वापरासाठी वीजपुरवठा घेऊन त्याचा व्यावसायिक व औद्योगिक कारणासाठी वापर करणे. यातही अनुमानित बिल आकारून वर्गवारी बदलण्यास अथवा दुसऱ्या वापरासाठी नवीन जोडणी घेण्यास सांगण्यात येते.
----------
कायदा काय सांगतो?
विद्युत कायदा २००३ नुसार कलम १२६ अंतर्गत शेजाऱ्याकडून अनधिकृत वीज घेणे, मंजुरीपेक्षा अधिक क्षमतेच्या भाराचा वापर करणे, मंजूर वर्गवारीतून दुसऱ्या वर्गवारीसाठी अनधिकृत विजेचा वापर करणे याबद्दल कारवाई होते. अनधिकृत वीज वापराला आळा बसावा, यासाठी महावितरणतर्फे सातत्याने मोहिमा राबविण्यात येत असतात. त्यामुळे ग्राहकांनी अवैध वीजजोडणी घेऊ नये.
--------------
ग्राहकांनी अधिकृत वीजजोडणी घेऊन मंजूर भारानुसार विजेचा वापर करावा. विजेचा अनधिकृत वापर आढळल्यास वीज कायदा २००३ मधील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई केली जाईल.
- विजयसिंह दूधभाते, जनसंपर्क अधिकारी, महावितरण
--------------
३८४ जणांवर झाली कारवाई
महावितरणच्या कल्याण १ मंडल कार्यालयांतर्गत एप्रिल २०२० ते जून २०२१ या कालावधीत वीज कायदा कलम १२६ नुसार, ३८४ जणांवर कारवाई करून एक कोटी ४६ लाख रुपयांचा बेकायदा वीजवापर उघडकीस आणण्यात आला.
------------