उल्हासनगर : शहरात पावसाळ्यापूर्वी नाले सफाई व रस्ता दुरुस्तीला मुहूर्त लागत नसल्याने, नाल्या शेजारील नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली. अचानक पाऊस सुरू झाल्यास तुंबलेल्या नाल्यामुळे पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच खड्डेमय रस्त्यामुळे अपघाताची शक्यता व्यक्त होत आहे.
उल्हासनगरात वालधुनी नदी व्यतिरिक्त खेमानी नाला, गुलशननगर नाला, गायकवाड पाडा आदी लहान-मोठे नाले कचऱ्याने तुंबले असून नाल्याची सफाई पावसाळ्यापूर्वी पोखलन, जेसीबी मशीन व डंपरच्या सहाय्यताने केली जाते. तसेच लहान नाल्याची सफाई हंगामी कामगाराद्वारे केली जाते. मात्र नालेसफाईचा ठेका निविदा प्रक्रियेत अडकल्याने, पुढील महिन्यात नाले सफाईचा मुहूर्त निघण्याची शक्यता महापालिका आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. याव्यतिरिक्त रस्त्यातील खड्डे भरण्याचे कामही पावसाळ्यापूर्वी केले जाते. मात्र अद्यापही रस्ता दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नाही. पावसाळ्यापूर्वी रस्त्यातील खड्डे भरले नाहीतर, नागरिकांच्या असंतोषाचा सामना महापालिकेला करावा लागणार आहे.
पावसाळ्यापूर्वी नाले सफाई... उपायुक्त सुभाष जाधव दरवर्षी प्रमाणे मोठ्या व लहान नाल्याची सफाई पावसाळ्यापूर्वी केली जाते. मात्र निवडणूक आचारसंहितामुळे नाले सफाईची निविदा काढण्यास विलंब झाला असलातरी, नाले सफाई पावसाळ्यापूर्वी होणार आहे.
रस्ते दुरुस्ती लवकरच.... उपायुक्त किशोर गवस शहरात भुयारी गटार योजना, एमएमआरडीए अंतर्गत मुख्य ७ रस्त्याचे काम सुरू असल्याने, बहुतांश रस्ते खोदलेले आहेत. तसेच जिओ कंपनी अंतर्गत रस्त्याच्या दोन्ही बाजूने केबल टाकण्याचे काम सुरू असल्याने, रस्ते खड्डेमय झाले. मात्र निविदा प्रक्रिया पूर्ण होताच रस्ते दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे बुजविण्याला सुरवात होणार आहे.
वालधुनी नदी कचऱ्याने तुंबली शहराच्या मधोमध वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या पुराचे पाणी सखल भागात व किनारी वसलेल्या झुडपट्टीत घुसत असल्याने, जीवित व वित्तीय नुकसान होते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नदीची सफाई केली जाते. यावर्षी नदी सफाईला विलंब।झाल्याने, स्थानिक नागरिक पुराचे पाणी घरात घुसण्याची भीती व्यक्त करीत आहेत.