ठाणे: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पक्षाला आणखी एक मोठा झटका दिला आहे. ठाणे महानगरपालिकेतील ६७ नगरसेवकांपैकी तब्बल ६६ नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. गुरूवारी या सर्व नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित होते. आता ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेचा एकमेव नगरसेवक राहिला आहे. दरम्यान एकनाथ शिंदेच्या लाटेतही एकमेव नगरसेवक उद्धव ठाकरेंसोबत राहिल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. ही नगरसेविका दुसरी कोणी नसून उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय राजन विचारे यांच्या पत्नी आहेत. त्यांना ठाण्याच्या प्रमुख नेत्यांपैकी एक मानले जाते, जिथे एकनाथ शिंदेंचा मोठा प्रभाव आहे.
राजन विचारेंच्या पत्नी नंदिनी विचारे
नंदिनी विचारे या ठाणे महानगरपालिकेतील एका प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. २०१७ मध्ये महापौर पदासाठी त्यांचे नाव खूप चर्चेत होते. विशेष म्हणजे बुधवारीच शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना लोकसभेच्या मुख्य प्रतोद पदावरून हटवण्यात आले. ही जबाबदारी आता राजन विचारे यांच्या खाद्यांवर सोपवण्यात आली आहे, जे नंदिनी याचे पती आहेत. सध्या हे पती-पत्नी दोघेही उद्धव ठाकरेंसोबत आहेत. ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासह एकूण ६६ नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांची नंदनवन या निवासस्थानी भेट घेतली होती. यानंतर हे सर्व नगरसेवक शिंदे गटात सामील झाले.
२५ वर्षांपासून ठाण्यात शिवसेनेची सत्ता
ठाण्यातील नगरसेवकांचा एक मोठा गट एकनाथ शिंदे गटासोबत गेल्याने उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसला आहे. कारण मागील २५ वर्षांपासून ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता राहिली आहे. मात्र, ठाण्यातील एक दिग्गज नेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या या खेळीमुळे शिवसेनेसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे ठाण्यातील शिवसेनेची वाटचाल अतिशय खडतर असल्याचे दिसत आहे. शिवसेनेच्या ६६ नगरसेवकांनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्यानंतर अद्याप शिवसेनेकडून कोणतेही अधिकृत विधान समोर आले नाही.
शिवसेनेच्या अडचणीत वाढ
मोठ्या कालावधीपासून ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंचे एकतर्फी वर्चस्व राहिले आहे. शिंदे प्रदीर्घ काळ ठाण्यात सेनेचे प्रभारी होते. मात्र त्यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेची आगामी वाटचाल कशी असेल अशी अटकळ बांधली जात आहे. अवघ्या काही महिन्यांतच ठाणे महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे, त्यामुळे आगामी निवडणुकींना शिवसेना कशी सामोरे जाते हे पाहण्याजोगे असेल.