कल्याण : राजकारणात असलो तरी लोकभावना व समाजकारण यालाच प्रथम प्राधान्य दिले जाईल, अशी भूमिका घेत मनसे आमदार राजू पाटील हे कार्यकर्त्यांसह नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी गुरुवारी नवी मुंबईतील सिडको भवन येथे झालेल्या घेराव आंदोलनात सहभागी झाले. यावेळी कल्याण ग्रामीण परिसरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त होता.
नवी मुंबई विमानतळास दि.बा. यांचे नाव देण्यासाठी भूमिपुत्र एकवटले आहेत. या मागणीस पाटील यांनी प्रथमपासून जाहीर पाठिंबा दिला आहे. मात्र, शिवसेनेने विमानतळास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचे जाहीर केले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दुसरीकडे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी विमानतळास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यावे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे मनसेचे एकमेव आमदार पाटील हे पक्षप्रमुखांनी घेतलेल्या भूमिकेनंतर कोणती भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
मात्र, बुधवारी रात्री पाटील यांनी सोशल मीडियावर त्यांची भूमिका जाहीर केली. त्यात दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या भूमिकेवर आधीपासून मी आग्रही होतो. आजही त्यावर ठाम आहे. पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी वस्तुनिष्ठ तांत्रिक बाजू मांडली असली तरी काही राजकीय मंडळी त्यातून वेगळा अर्थ काढून त्याचा विपर्यास करीत आहेत. हे सांगताना त्यांनी शिवसेनेच्या नेते मंडळीकडून हा प्रकार केला जात असल्याचा आरोप केला.
‘पक्षाशी मी एकनिष्ठ
ते पुढे म्हणाले, ‘दि.बा. यांचे नाव विमानतळास देण्याच्या आंदोलनात माझा पूर्ण समाज उतरला आहे. त्यांच्या भावनेचा विचार करणे मला भाग आहे. त्यांच्या प्रेमाखातर व त्यांच्या सहकार्यामुळेच आज मी आमदारपदापर्यंत पोहोचलो आहे. राजकारणात असलो तरी लोकभावना आणि समाजकारण याला प्रथम प्राधान्य देणे हे माझे कर्तव्य आहे. वेगळे अर्थ काढणाऱ्यांनी खुशाल वेगळे अर्थ काढावेत. समाज आणि पक्षाशी मी एकनिष्ठ आहे. यापुढेही राहणार आहे.’
------------