- जान्हवी मोर्ये कल्याण : दिवाळीत सोसायट्यांच्या आवारांत, रस्त्यांवर विविध राजकीय पक्षांतर्फे लावण्यात येणारे मोठे बांबू व कापडापासून बनवलेले आकाशकंदील सर्वांचे लक्ष वेधून घेतात. हे आकाशकंदील बनवण्यात बुरूड समाजाचा हातखंडा आहे. कल्याण-मुरबाड रस्त्यावर या समाजाची पाचवी पिढी हे कंदील बनवून आपली कला जपण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, दोन वर्षांपासून या कंदिलाची के्रझ कमी होत आहे. आमच्या कलेला किंमत मिळावी, एवढीच माफक अपेक्षा हे कंदील व्यावसायिक करत आहेत.राणी रोहिटे म्हणाल्या, माझ्या पतीच्या पणजोबांपासून हा व्यवसाय सुरू आहे. पतीच्या निधनानंतर आता हा व्यवसाय मी सांभाळत आहे. आमचा समाज हेच काम करत आहे. त्यामुळे एका पिढीकडून दुसरी पिढी ही कला आत्मसात करीत आहे. आम्ही हे काम पाहूनच शिकलो. कापूस, बांबू, लेस, धागा, गोल्डन पट्टी आणि गम, असे विविध प्रकारचे साहित्य वापरून हे कंदील बनवतो. मासा, पणती, पारंपरिक आकाशकंदील, चांदणी, चेंडू असे विविध प्रकार या कंदिलांमध्ये केले जातात. आकारानुसार या कंदिलांचा भाव ठरतो. ग्राहक खूप घासाघीस करतात. मोठ्या कंदिलाला अपेक्षित किंमत देत नाही. यावर्षी कंदिलांची फारशी नोंदणी झालेली नाही. कापडावर जीएसटी लागतो. कच्च्या मालाच्या किमतीही वाढल्या आहेत. हा कच्चा माल दहागाव, मुंबई आदी ठिकाणांवरून आणतो. महागाई वाढली आहे. परंतु, आम्ही कंदिलाच्या किमती वाढवलेल्या नाहीत.शुभम नागे म्हणाला, यंदाच्या वर्षी फार कंदील तयार केले नाहीत. महागाई वाढल्याने ग्राहक येत नाहीत. दिवाळीच्या तोंडावर आता कुठे कंदिलाची चौथी आॅर्डर मिळाली आहे. एका रुग्णालयासाठी हे कंदील बनवत आहे. एक कंदील तयार करायला एक दिवस लागतो.डिझाइन्स कमीकंदील मोठ्या आकाराचे असल्याने फारशा डिझाइन केल्या जात नाहीत. दिवाळीच्या १५ दिवस आधी कामाला सुरुवात होते. गेल्यावर्षीपेक्षा ५० टक्के आॅर्डर कमी आल्या आहेत. पिढीजात व्यवसाय असल्याने आम्ही तो करत आहे. इतर दिवसांत सूप, टोपल्या, शिडी बनवण्याचा व्यवसाय करतो, असे अमर कुकडे यांनी यावेळी सांगितले.
बांबू, कापडाच्या आकाशकंदिलांचे आजही आकर्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2018 12:07 AM