पालघर : गेल्या अनेक दशकांपासून या जिल्ह्याला वेढून टाकणारे कुपोषण अजूनही संपण्याचे नाव घेत नाही. जिल्ह्यात असलेल्या मोखाडा, जव्हार, तलासरी, वाडा, विक्रमगड, डहाणू या सर्व जिल्ह्यात असलेल्या आरोग्य केंद्रांतील कुपोषित बालकांची आकडेवारी हेच सत्य सांगते आहे.कुपोषण आटोक्यात आणण्यासाठी आणलेल्या अंगणवाडी, आशा सेविका, पोषण आहार व आरोग्य विषयक योजना आखल्या जातात. परंतु त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कोणतीही यंत्रणा निर्माण केली जात नाही. त्यामुळे योजना उत्तम, निधीची तरतूद भरपूर परंतु त्याचा वापर कसा होतो याकडे कोणाचेच लक्ष नाही. त्यामुळे कुपोषितांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. कुपोषणाच्या समस्येचे खरे मूळ बेरोजगारी, अज्ञान, बालविवाह हे आहे. परंतु त्यावर कोणताही इलाज केला जात नाही. रोहयोची कामे मागूनही महिनोंमहिने मिळत नाहीत. त्यामुळे स्थलांतर होते त्याचा परिणाम मुलांवर होतो. जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात पुरेसे डॉक्टर नाहीत. काही ठिकाणी नर्सपण नाहीत. तर अनेक ठिकाणी औषधेही नाहीत. जिथे आहेत तिथे ती गरज नसलेली अथवा कालबाह्य झालेली त्यामुळे त्यांचा काहीही उपयोग होत नाही.पोषण आहाराची योजना सरकार राबवते परंतु हा आहार शिजविण्याची भांडी नाहीत, ज्या बचत गटांना आहार शिजविण्याचे कंत्राट दिले त्यांना सहासहा महिने पैसे नाहीत. वेतन नाही. अशा स्थितीत पोषण आहार द्यायचा तरी कसा? असा प्रश्न अंगणवाडी सेविकांनी उपस्थित केला आहे.गेली तीन वर्षे आश्रमशाळांतील आहार शिजविण्याकरीता लागणाऱ्या भांड्यांचे कंत्राट लालफितीत आहे. त्यामुळे फुटक्या भांड्यात स्वयंपाक होतो आहे. मध्यंतरी मंत्री, आमदार, खासदार, विरोधी पक्षनेते यांनी दौरे केले. आरोग्यमंत्रीही तीन वेळा येऊन गेले. परंतु दिलेली आश्वासने प्रत्यक्षात आलीच नाही. स्थिती जैसे थे राहिली त्यामुळे कुपोषणावर नियंत्रण मिळवता आले नाही. असे यंत्रणातील अधिकारीच सांगतात. यावर लवकर इलाज केला नाहीतर पुन्हा एकदा कुपोषित बालकांच्या आणि मातांच्या मृत्यूचे कांड सुरू होण्याची शक्यता जाणवते आहे. आतातरी नेत्यांना आणि मंत्र्यांना पाझर फुटावा अशी अपेक्षा आहे. (वार्ताहर)
पालघर जिल्ह्यात आजही कुपोषण वाढतेच आहे
By admin | Published: January 30, 2017 1:32 AM