ठाणे - पोलिस आणि पालिका प्रशासनात असलेल्या एकोप्यातून पालिकेने पोलीस दलाला गस्तीसाठी १५ रॉयल एनफ्लिड गाड्या देण्याचा प्रस्ताव महासभेत आणला होता. परंतु महासभेने तो प्रस्ताव सर्वानुमते नामंजुर केला आहे. असे असले तरी देखील पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मात्र आपल्या अधिकारात या गाड्या देण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महासभेच्या निर्णयाला एकप्रकारे आयुक्त आता पुन्हा एकदा आव्हान उभे करणार असल्याचेच दिसत आहे. त्यामुळे ज्या सदस्यांनी आणि महापौरांनी देखील या प्रस्तावाला विरोध केला असतांना आता ते काय भुमिका घेणार हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पोलिस दलाला लोकांच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना राबवायच्या असल्या तरी त्यांना सरकारी तिजोरीतून पुरेसा निधी उपलब्ध होत नाही. पोलिस ठाणे उभारणीसाठी निधी मिळवितानाही त्यांच्या नाकी नऊ येतात. मात्र, ठाणे पालिकेने मागील दोन वर्षांत पोलिस दलाला मदतीचा हात दिलेला आहे. कापुरबावडी आणि कळवा या दोन पोलिस ठाण्याची उभारणी पालिकेने दिलेल्या कन्स्ट्रक्शन टीडीआरमुळे झाली आहे. तर, चितळसर पोलिस ठाणे बीएसयूपीच्या इमारतीत सुरू करण्यातही पालिकेचा पाठपुरावाच कारणीभूत ठरला. त्यामुळे पोलिस आणि पालिका प्रशासन यांच्यात सलोखा अधिक वाढल्याचे दिसून आले. परंतु आता पालिकेने तर, त्यांना तब्बल २५ लाखांच्या गाड्या खरेदी करुन देण्याची भुमिका पुढे आणली आणि सर्वांच्या नजरा विस्फारल्या.ठाणे शहर परिसरात कायमस्वरूपी फिरती गस्त राहावी, यासाठी पोलिसांनी ३० बुलेट वाहने खरेदी करून देण्याचा प्रस्ताव महापालिकेपुढे मांडला होता. त्यानुसार पालिकेने पहिल्या टप्प्यात रॉयल इनिफल्ड (३५० सीसी) या मॉडेलची १५ वाहने खरेदी करण्याचा प्रस्ताव शुक्रवारच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला होता. यासाठी सुमारे २५ लाख रु पयांचा खर्च येणार आहे. दुसºया टप्प्याची खरेदी नव्या आर्थिक वर्षात करण्यात येणार आहे. परंतु पोलिसांसाठी आपण का वाहन खरेदी करुन द्यायची असा सवाल अनेक सदस्यांनी महासभेत उपस्थित करीत हा प्रस्ताव सर्वानुमते नामंजुर करण्यात आला. दरम्यान आता आयुक्तांनीच महासभेच्या या निर्णयाच्या विरोधात जाऊन आपल्या अधिकाराचा वापर करण्याचा निर्णय घेतला असून त्याच अधिकाराच्या जोरावर पोलिसांना या गाड्या देण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी देखील महासभेने केलेले अनेक ठराव प्रशासनाने अमान्य केले आहेत. त्यानंतर आता पुन्हा महासभेच्या विरोधात आयुक्त निर्णय घेणार असल्याने महासभेत ज्या ज्या सदस्यांनी या प्रस्तावाला विरोध केला होता. ते आता काय भुमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महासभेने प्रस्ताव नामंजुर केला असतांनाही आयुक्त देणार पोलिसांना गस्तीसाठी गाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 3:14 PM
महासभेने पोलिसांना गस्तीसाठी लागणाऱ्या देण्यासंदर्भातील प्रस्ताव नामंजुर केला असतांना देखील आयुक्तांनी आता आपल्या अधिकाराचा वापर करीत पोलिसांना या गाड्या देण्याचा निर्णय घेतला आहे.
ठळक मुद्देमहासभेच्या निर्णयाला दाखविली जाणार केराची टोपलीविरोध करणारे सदस्य काय भुमिका घेणार