मुरबाड : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मुरबाड तालुक्यातील सिद्धगड येथे हुतात्मा झालेले वीर हुतात्मा भाई कोतवाल व वीर हुतात्मा हिराजी पाटील यांना आदरांजली वाहण्यासाठी १ व २ जानेवारी रोजी सिद्धगडावर विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा व देशभक्तीपर कार्यक्र म होणार असल्याची माहिती सिद्धगड स्मारक समितीचे अध्यक्ष माजी आमदार गोटीराम पवार यांनी दिली.
१ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता वक्तृत्व व समूहगान स्पर्धा होणार आहे. वक्तृत्व स्पर्धेत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी हुतात्मा भाई कोतवाल व हिराजी पाटील, पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी आझाद दस्त्याचे शिलेदार व जे देशासाठी लढले, आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी धारातीर्थ सिद्धगड व स्फूर्ती सिद्धगडाची व अकरावीपासून पुढील खुल्या गटासाठी आझाद दस्ता :- स्वातंत्र्यलढ्यातील सुवर्णपान व सिद्धगड ऐतिहासिक लढा, जतन आणि जाणीव हे विषय आहेत. तसेच या चार गटांत समूहगान स्पर्धा होणार आहे.हुतात्मा कोतवाल व पाटील यांना २ जानेवारी १९४३ रोजी ब्रिटिशांविरोधात लढताना सिद्धगडावर वीरगती प्राप्त झाली. या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी १ जानेवारीच्या सायंकाळपासून विविध देशभक्तीपर कार्यक्र म होतात. रात्रभर विद्यार्थी व देशप्रेमी नागरिक मशाली घेऊन सिद्धगडावर येतात. २ जानेवारीच्या सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी हुतात्मा ज्योत प्रज्वलित करून मानवंदना दिली जाते.ठाणे व रायगड जिल्ह्यातील हजारो देशप्रेमी नागरिक या कार्यक्र मासाठी सिद्धगडाच्या जंगलात उपस्थित असतात. या कार्यक्र मास गृहमंत्री एकनाथ शिंदे, खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबीय यांच्यासह ठाणे, रायगड, पुणे, नगर जिल्ह्यातील नागरिक उपस्थित राहणार आहेत.प्रशासनाची जय्यत तयारीघनदाट जंगलात निर्मनुष्य अशा ठिकाणी असणाऱ्या सिद्धगडावरील हुतात्मा स्मारक परिसरात नागरिकांसाठी सरकारतर्फे यावर्षी वीजपुरवठा, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, रस्ता, वैद्यकीय सुविधा आदींची जय्यत तयारी करण्यात आली आहे.२ जानेवारीला पेटवली जाणार मशालया कार्यक्रमासाठी नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी होते. याच कार्यक्रमात २ जानेवारीला स्थानिक स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांच्या हस्ते मशाल पेटवली जाते. तेव्हा उपस्थितांकडून जोरदार घोषणा दिल्या जातात.मुरबाड तालुक्यातील सिद्धगडावर हुतात्मा भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांच्या बलिदानस्थळावर उभारण्यात आलेली हुतात्माज्योत.