भार्इंदर : मीरा रोड येथील आरएनए ब्रॉड वे गृहसंकुलातील सुविधा भूखंडावर (आरजी) विकासकाने त्यातील रहिवाशांसाठी क्लब हाउस बांधले होते. ते रहिवाशांच्या वापरासाठी हस्तांतरित न करता विकासकाने ते थेट एका कंत्राटदाराला भाडेतत्त्वावर दिले. यामुळे रहिवाशांनी आमदार नरेंद्र मेहता यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. याची दखल घेत मेहता यांनी रविवारी थेट क्लब हाउसलाच टाळे ठोकले. या गृहसंकुलात ८५० सदनिका आहेत. विकासकाने गृहसंकुलात सर्व सुविधा असलेले क्लब हाउस बांधले. विकासकाने ते रहिवाशांसाठी उपलब्ध करून न देता थेट कुणाल केरकर या कंत्राटदाराला भाडेतत्त्वावर दिले. यामुळे १२ वर्षांपासून रहिवाशांचा क्लब हाउस हस्तांतरणाचा विकासकासोबत वाद सुरू आहे. पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी रहिवाशांच्या तक्रारीची दखल घेत विकासकाला ते क्लब हाउस रहिवाशांकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, विकासकानेही हस्तांतरणाला सकारात्मक प्रतिसाद देत तसे लेखी पत्र आयुक्तांना दिले. परंतु,कंत्राटदाराने आरजीवर बांधण्यात आलेल्या वास्तूवर मालमत्ताकर लागू होत नसतानाही त्याने पालिकेतील अधिकाऱ्यांशी संगनमत करून करधारकांच्या यादीत आपले नाव समाविष्ट करून घेतले. तसेच वीजबिलही नावावर केले. रहिवाशांनी वीजबिलावरील कंत्राटदाराचे नाव रद्द करण्यासाठी कंपनीकडे पत्रव्यवहार केल्याने ते रद्द झाले. (प्रतिनिधी)
अखेर क्लब हाउसला टाळे
By admin | Published: January 23, 2017 5:32 AM