डोंबिवली : डोंबिवलीहून सुटणारी सकाळची ६ वाजून १४ मिनिटांची लोकल स्थानकात रिकामी आल्याने डोंबिवलीकर प्रवाशांना दिलासा मिळाला. ही लोकल कल्याण यार्डात उभी असते. कल्याणचे प्रवासी यार्डातच या लोकलमध्ये बसत असत. त्यामुळे डोंबिवली स्थानकात येण्याआधीच तुडुंब भरून येणाऱ्या लोकलचा डोंबिवलीकरांना काडीचाही फायदा होत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी होती. मंगळवारी ‘हॅलो ठाणे’च्या अंकात ‘जलद डोंबिवली लोकल कल्याणला फुल्ल’ हे वृत्त प्रसिद्ध करून प्रवाशांच्या नाराजीला वाट करून दिल्यानंतर त्याची दखल घेत मध्य रेल्वेने यार्डातून रिकामी गाडी डोंबिवलीत पाठवल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त केला.डोंबिवलीचे रहिवासी मंदार अभ्यंकर या लोकलने नेहमी प्रवास करतात. ते म्हणाले की, अखेर अनेक महिन्यांपासून सुरू असलेली समस्या सुटल्याने आनंद आहे. कल्याण येथून लोकल भरून येते. यासंदर्भात रेल्वे प्रशासनाला माहिती होते तर त्यांनी यासंदर्भात आधीच कार्यवाही करणे गरजेचे होते. माध्यमांनी आवाज उठवल्यानंतरच दखल का घेतली जाते? असेही ते म्हणाले.१५ डब्यांऐवजी १२ डब्यांची लोकलबधुवारी पहाटे लोकल जरी पूर्ण रिकामी आली होती, तरीही ती पंधरा डब्यांएवजी १२ डब्यांची होती. त्यासंदर्भात लोकल स्थानकात येण्याआधी त्याची उद्घोषणा केल्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली होती. मात्र, लोकल रिकामी आल्याने त्याबाबत फारशी नाराजी दिसून आली नाही.
अखेर जलद डोंबिवली लोकल आली रिकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:11 AM