ठाणे : शारीरिक व्याधीने बळी पडलेल्या ठाण्यातील वृद्धाचा मृतदेह स्वीकारण्यास नातलग व सख्ख्या भावाने नकार दिल्याचे लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच, दुसऱ्याच दिवशी त्यांचे बडोदा येथील भाऊ ठाण्यात दाखल झाले. त्यानंतर या घटनेला वाचा फोडणारे समाजसेवक कृष्णा भुजबळ आणि संजय यादव आदींच्या सहकार्याने मृतावर कळवा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले.पारशीवाडीतील बाळ सराफ चाळीनजीकच्या घरात एकटेच वास्तव्य करणाºया ५८ वर्षीय व्यक्तीचा १८ जून रोजी रुग्णालयात मृत्यू ओढवला होता. त्यांना भुजबळ यांनी दाखल केले होते. या रुग्णाला कोरोनाची लक्षणे नव्हती. तरीही त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच त्यांच्या एका भावाने घराचा ताबा घेतला, मात्र अंत्यसंस्काराची जबाबदारी टाळून पळ काढला होता. याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर मृताच्या वारसांना चूक कळली. त्यानंतर बडोदा येथील त्यांचे भाऊ २४ जून रोजी ठाण्यात आले. त्यांनी भुजबळ यांची भेट घेऊन अंत्यसंस्कार करण्यासाठी मदत मागितली. भुजबळ व यादव यांनी आर्थिक जुळवाजुळव करून मृतावर अंत्यसंस्कार केले.
अखेर बडोद्याच्या भावाने स्वीकारला वृद्धाचा मृतदेह, चूक उमगली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 12:40 AM