- अजय महाडिक भिवंडी : भिवंडीतील क्वॉर्टर गेट येथील वादग्रस्त ठरलेल्या पोलीस स्टेशनच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होणार आहे. महाराष्टÑ स्टेट पोलीस हाउसिंग अॅण्ड वेल्फेअर कॉर्पोरेशन लिमिटेड या गृहनिर्माण संस्थेकडून या वास्तूची उभारणी होणार आहे. यासंदर्भातील प्रशासकीय मान्यता मिळाली असून आर्थिक तरतूद होताच प्रत्यक्ष बांधकामाला सुुरुवात होणार असल्याची माहिती भिवंडी परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी दिली आहे. साधारण साडेआठ हजार चौरस मीटरची ही तीन मजली वास्तू असून येथून निजामपूर पोलीस स्टेशनचे कामकाज चालणार आहे.क्वॉर्टर गेट मशिदीसमोरील कबरस्तानला लागूनच ही जागा असल्याने हे प्रकरण चिघळले होते. तसेच ती जमीन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असल्याने प्रत्यक्ष बांधकामात असंख्य अडचणी होत्या. अखेर, दीड वर्षापूर्वी एजन्सी नेमून सर्वेक्षण करून त्याद्वारे ती जागा पोलीस हाउसिंगच्या अखत्यारित आल्यानंतर पोलीस स्टेशनच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला असल्याचे पाटील यांनी लोकमतला सांगितले. फेब्रुवारी २०१८ मध्ये ही जमीन सा.बां. विभागाकडून पोलीस हाउसिंगकडे वर्ग झाल्यानंतर त्यावरील बांधकामाच्या दिशेने नकाशे तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. स्ट्रक्चरल आॅडिट रिपोर्टनुसार पूर्वीचे बांधकाम काढून नव्याने उभारणी करावी लागणार आहे. पूर्वी झालेल्या अर्धवट बांधकामावर १७ लाख रुपये खर्च झाला आहे.
अखेर भिवंडीच्या क्वॉर्टर गेटसमोर उभे राहणार पोलीस ठाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 5:45 AM