कल्याण : केडीएमटीच्या गणेशघाट आगारात आणि मेट्रो मॉलच्या जागेत सध्या खितपत पडलेल्या ६९ बसची लिलावात विक्री करण्याचा निर्णय उपक्रमाने घेतला आहे. याबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी या बसची पाहणी केली आहे. बस लिलावासंदर्भातल्या स्थगित विषयावर डिसेंबरच्या महासभेत दिलेल्या आदेशानुसार केडीएमटीचे व्यवस्थापक मारुती खोडके यांनी वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर केला आहे. २० जानेवारीच्या महासभेत बसच्या लिलावाबाबत कोणता निर्णय घेतला जातो? याकडे लक्ष लागले आहे.
२०११ ते २०१४ या कालावधीत खरेदी केलेल्या ७० बसपैकी एक अपघातग्रस्त बस वगळता उर्वरित ६९ बसचा लिलाव करण्याचा निर्णय केडीएमटी उपक्रमाने घेतला आहे. याला परिवहन समितीने हिरवा कंदील दाखवला आहे. देखभाल-दुरुस्तीचा वाढलेला खर्च आणि वाहक-चालकांची कमतरता यामुळे बस लिलावात काढण्याची वेळ आल्याचे स्पष्टीकरण केडीएमटी उपक्रमाने दिले असले, तरी महासभेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यात लिलावाच्या निर्णयाला माजी परिवहन सदस्य इरफान शेख यांनीही हरकत घेतली आहे. लिलावाच्या माध्यमातून आणखीन एखादा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
बस लिलावात काढण्याचा प्रस्ताव आॅगस्टमध्ये झालेल्या महासभेत आला होता. त्यावेळी झालेल्या चर्चेत बसची पाहणी केल्याशिवाय निर्णय घेऊ नये, असा मुद्दा नगरसेवकांनी उपस्थित केल्याने महापौर विनीता राणे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने १९ नोव्हेंबरला ६९ बसची पाहणी केली. बसच्या दुरवस्थेला उपक्रमातील अधिकारी जबाबदार आहेत. त्यांची चौकशी करावी, अशी मागणी तेव्हा करण्यात आली होती.
लिलावाचा स्थगित प्रस्ताव डिसेंबरच्या महासभेत पुन्हा निर्णयासाठी ठेवला गेला होता. त्यावेळीही हा प्रस्ताव स्थगित ठेवत केडीएमटी उपक्रमाला वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश महापौर राणे यांनी दिले होते. त्यानुसार, व्यवस्थापक खोडके यांनी अहवाल महासभेला सादर केला आहे.
महापौरांच्या अध्यक्षतेखालील समितीने बसची पाहणी केली आहे. त्याचबरोबर आता उपक्रमाने वस्तुस्थितीदर्शक अहवालही दिला आहे. त्यामुळे येत्या २० जानेवारीच्या महासभेत बसच्या लिलावासंदर्भात ठोस भूमिका घेतली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.त्याप्रमाणे निर्णय होतो का?ज्या बस दुरुस्त करून सेवा देऊ शकतील, त्यांचा वापर पुन्हा सुरू केला जाईल. पण, ज्या बसचा वापर होऊ शकत नाही, त्यांचा लिलाव केला जाईल. यातील काही बसचा वापर महिलांसाठी पिंक टॉयलेटसाठी करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी एका संस्थेने पुढाकारही घेतला आहे. हे टॉयलेट फिरते असेल, खासकरून रेल्वेस्थानक परिसरात त्याचा वापर केला जाईल, अशी माहिती स्थायी समितीचे माजी सभापती दीपेश म्हात्रे यांनी मागील महिन्यात ‘लोकमत’शी बोलताना दिली होती. त्याप्रमाणे निर्णय घेतला जातो का? हेही येत्या महासभेत स्पष्ट होईल.