- जान्हवी मोर्येडोंबिवली : जगातील उत्तुंग शिखर असलेले एव्हरेस्ट सर करण्याची इच्छा प्रत्येक गिर्यारोहकाला असते. एखाद्या मातब्बर गिर्यारोहकाने एव्हरेस्ट सर करणे समजू शकतो, पण आदिवासी भागातील विकास सोयम व मनीषा धुर्वे यांनी तो सर करून सगळ्यांना आश्चार्याचा धक्का दिला आहे. मात्र, त्यांना याआधी एव्हरेस्ट काय आहे, हे माहीत देखील नव्हते, अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली आहे.१७ मे २०१८ ला या दोघांनी एव्हरेस्ट सर केला. विकास हा चंद्रपूर जिल्ह्यातील एक आदिवासी तरुण. त्याने १२ वीपर्यंत कला शाखेतून शिक्षण घेतले आहे. आता तो पुढील महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. एव्हरेस्ट मोहिमेविषयी अभ्यास असलेले अविनाश देवस्कर त्याच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत आले होते. देवस्कर यांनी त्यांना एव्हरेस्टविषयी माहिती दिली. त्याचवेळी विकासने एव्हरेस्ट सर करण्याची इच्छा व्यक्त केली. तिथूनच एव्हरेस्ट चढाईची तयारी सुरू झाली. शारीरिक तपासण्या पूर्ण झाल्यानंतर त्यांना चंद्रपूर, हैदराबाद, दार्जीलिंग त्याविषयी प्रशिक्षण दिले गेले. १० महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर प्रत्यक्ष मोहीम सुरू झाली. एव्हरेस्ट सर केल्यावर मुंबईत सत्कार झाला. तेव्हा कुटुंबियांना मुलाने काय अचाट कामगिरी केली आहे, याची माहिती मिळाली. तोपर्यंत घरीही विकासच्या मिशनविषयी कोणतीच माहिती नव्हती. चढाई अत्यंत अवघड असल्याने त्यावेळी पाय दुखत होते. मात्र ध्येय खुणावत होते. त्यामुळे ते पूर्ण केले, असे विकासने सांगितले. घरी आई वडील, लहान भाऊबहीण आहेत. विकासच्या यशाचा त्यांना मोठा आनंद झाला. एव्हरेस्ट सर करण्यापूर्वी शेतीकडे वळण्याचा विचार होता. एव्हरेस्ट सर केल्यावर आता तो विचार विकासने बदलला आहे. त्याला गिर्यारोहणात करिअर करण्याची इच्छा आहे.देवाडा शाळेत शिकणारी मनीषा यंदा १२ वी कला शाखेत शिकत आहे. तिच्याही शाळेत देवस्कर गेले होते. त्यांनी माहिती दिल्यावर तिच्याही मनात एव्हरेस्टवर चढाई करण्याची इच्छा झाली. तिनेही विकासप्रमाणे १० महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले. परीक्षेत ती यशस्वी झाली. ती तिच्या चढाईची पहिली पायरी ठरली. घरातून तिला यासाठी विरोध नव्हता, कारण कुटुबीयांना या मोहिमेविषयी काहीच माहिती नव्हती.पण आता मुलीने एव्हरेस्ट सर केल्याचा सार्थ अभिमान त्यांना आहे. घरी आई-वडील,भाऊ असा परिवार आहे. एव्हरेस्ट सर केल्यावर तिच्या मनात विविध लहान शिखरे सर करण्याची इच्छा जागृत झाली आहे. त्यानुसार ती यापुढे लहान शिखरेही सर करणार आहे.>डोंबिवलीत आज विशेष सत्काररिटा पॉल यांच्या स्मरणार्थ होणाऱ्या शनिवारी, २३ जूनला होणाºया आई महोत्सवात विकास सोयम, मनीषा धुर्वे आणि त्यांच्या आईचा विशेष सत्कारहोणार आहे. हा सोहळा सावित्रीबाई फुले कलामंदिरात सकाळी ९ वाजता रंगणार आहे. सामान्यांनी शिखर सर करणे हे समजू शकतो. आदिवासी तरुण-तरुणीने शिखर सर करणे ही उल्लेखनीय आणि प्रेरणादायी बाब आहे. हा आदर्श समाजात पोहोचवण्यासाठी हा सत्कार केला जाणार असल्याचे डॉ. अरुण पाटील त्यांनी सांगितले.
एव्हरेस्ट काय आहे माहीत नव्हते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 3:27 AM