सदानंद नाईक, उल्हासनगरकेंद्र व राज्य शासनाच्या योजनेद्वारे प्रत्येक घरी शौचालय बांधण्याचा चंग पालिकेने बांधला असून सार्वजनिक ठिकाणांसह मार्केटमध्ये महिला शौचालय बांधले जाणार आहेत. आयुक्त मनोहर हिरे यांनी आरोग्य विभागाची बैठक घेऊन योजनेची माहिती दिली आहे. तसेच शौचालयांसाठी जागेच्या सर्वेक्षणाचे आदेशही दिले आहेत. उल्हासनगर महापालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून तीन टप्प्यांत ४२ कोटींच्या निधीतून बहुमजली १६२ शौचालये बांधली आहेत. शौचालयांची निगा सामाजिक संस्था करीत असून वीज व पाणीबिलापोटी दरमहा २ हजार रुपये अनुदान देत आहे. असंख्य ठिकाणी सार्वजनिक शौचालये नसल्याने नागरिक व महिलांची कुचंबणा होत असून महिला, मुले व पुरुष उघड्यावर शौचास जात आहेत. वालधुनी नदीकिनारा, डम्पिग ग्राउंड परिसर, गायकवाडपाडा, खदान विभाग, भरतनगर रेल्वे पटरी, वडोलगाव, शांतीनगर, मातोश्रीनगर, करोतियानगर आदी ठिकाणी उघड्यावर शौच करण्याचे चित्र आहे.महापालिका केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने प्रत्येक घरी शौचालयाची योजना राबविणार असून केंद्र व राज्य एका शौचालयासाठी १२ हजारांचे अनुदान देणार आहे. शौचालयांसाठी जागा नसल्यास १० ते १२ घरांचा समूह गु्रप बनवून सार्वजनिक शौचालय बांधणार आहे. पालिकाही शौचालय बांधणीच्या खर्चात वाटा उचलणार असून शहर हगणदारीमुक्त करणार असल्याची माहिती आयुक्त मनोहर हिरे यांनी दिली आहे. महिलांची कुचंबणा थांबणारशहरात प्रसिद्ध जपानी मार्केट, फर्निचर मार्केट, इलेक्ट्रॉनिक मार्केट, जीन्स मार्केट, बॅग मार्केट, गाऊन मार्केट, गजानन मार्केट, प्रेस बाजार आदी मार्केट आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण, कर्जत, कसारा, मुरबाड, नगर आदी ठिकाणांहून शेकडो नागरिक मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी येत असतात. मार्केटमध्ये शौचालयांची सुविधा नसल्याने महिलांसह नागरिकांची कुचंबणा होत आहे. ही कुचंबणा थांबविण्यासाठी मार्केटसह सार्वजनिक ठिकाणी महिला शौचालये उभारण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त हिरे यांनी दिली आहे.
पालिका बांधणार प्रत्येक घरी शौचालय
By admin | Published: June 08, 2015 4:46 AM