ठाणे : ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयात वर्षाला उपचारादरम्यान २००१ पासून दरवर्षी १ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मागील आठवड्यात तर तीन दिवसांत १२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या रुग्णालयातील वर्षातील मृत्यूची आकडेवारी पाहता दिवसाला तीन ते चार रुग्ण दगावत असल्याचेच या आकडेवारीवरून स्पष्ट होते आहे.ठाणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरातील गरीब रु ग्ण ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. या रुग्णालयातील उपचारपद्धतीवर विश्वास ठेवून ते या ठिकाणी उपचारासाठी येतात. परंतु, मागील काही वर्षांपासून या रुग्णालयावर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे नियंत्रणच राहिले नाही. त्यामुळे तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना खाजगी रुग्णालयात पाठविण्याचा सल्ला येथे बहुतेक वेळा दिला जातो. या रुग्णालयातील मेडिकलसुद्धा गेल्या चार ते पाच वर्षांपासून बंदावस्थेत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून महागडी औषधे घ्यावी लागतात. सुटीच्या दिवशी रुग्ण तपासणीसाठी वरिष्ठ डॉक्टर उपस्थित नसतात. प्रत्येकवर्षी हृदयविकाराचे रुग्ण, ब्रेन हॅमरेज, किडनी फेल अशा मोठ्या आजारांच्या रुग्णांचा मृतांच्या आकडेवारीत समावेश आहे. तसेच नवजात बालकांच्या मृत्यूचा आकडादेखील वाढता आहे. केवळ अशा मोठ्या आजारांवरील साधनसामग्री व डॉक्टर या रुग्णालयात उपलब्ध नसल्यानेच हे प्रमाण वाढत असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. या रुग्णालयात खासकरून ग्रामीण भागातून गरोदर महिला उपचारासाठी येतात. त्यामुळे जन्माला येणाऱ्या नवजात बालकाचे वजन कमी असते. परिणामी, अशा नवजात मुलांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
दरवर्षी उपचारादरम्यान १ हजार रुग्णांचा मृत्यू
By admin | Published: May 07, 2015 3:01 AM