ठाणे : आम्ही कसे व किती वेगाने धावतो, हे आपण पाहिलेच आहे... ठाणेकर धावण्याच्या बाबतीत सरस आहेत... अशा मिश्कील कोट्या करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे हे ऐतिहासिक आणि धावणाऱ्यांचे शहर आहे. चांगल्या आरोग्यासाठी धावणाऱ्या ठाणेकरांकरिता महामॅरेथॉनचे आयोजन करून ‘लोकमत’ने आरोग्याची काळजी घेण्याचा व फिट राहण्याचा संदेश दिल्याचे कौतुकाचे बोलही मुख्यमंत्र्यांनी शनिवारी काढले.
‘लोकमत’च्या वतीने आयोजित महामुंबई महामॅरेथॉनचा आणि एक्स्पोचा प्रारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ठाणे शहराने सगळ्यांना सांभाळले आहे. ठाणे शहरावर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विशेष प्रेम होते. ठाणे शहर हे सगळ्यांना सहकार्य करणारे शहर आहे. त्यामुळेच ‘लोकमत’च्या वतीने ठाण्यात होत असलेल्या या २७ व्या महामॅरेथॉनलाही ठाणेकरांनी आपलेसे केल्याचे ते म्हणाले.
‘लोकमत’ केवळ बातम्याच देत नाही तर विविध उपक्रम राबविते. जेव्हा राज्यात रक्ताची गरज होती तेव्हा महारक्तदान शिबिराचे ‘लोकमत’ने आयोजन करून ६१ हजार बाटल्या रक्त जमा केले. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रकाशझोतात आणून त्यांचा पुरस्काराने सन्मानित करण्याचे काम ‘लोकमत’ने केले आहे. मलासुद्धा महाराष्ट्रीयन ऑफ दी इअर पुरस्कार दिल्लीत दिला होता, याची आठवणही त्यांनी काढली.
यावेळी मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांचे स्वागत रुचिरा दर्डा आणि राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ‘लोकमत’चे एक्झिकेटिव्ह डायरेक्टर व संपादकीय डायरेक्टर करण दर्डा, आमदार संजय केळकर, प्रताप सरनाईक, निरंजन डावखरे, सहपोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, वनरूपी क्लिनिकचे संचालक राहुल घुले, महामॅरेथॉनच्या फाउंडर रुचिरा दर्डा, लोकमत मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी, उपाध्यक्ष विजय शुक्ला आदी उपस्थित होते.
स्वातंत्र्यसेनानींचा आशीर्वादस्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असल्याने विजेत्यांना दिल्या जाणाऱ्या मेडलवर एका बाजूला स्वातंत्र्यसेनानींच्या छायाचित्रासह ‘लोकमत’चे संस्थापक संपादक आणि स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांचे छायाचित्र आहे. मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला नसला तरी स्वातंत्र्यसेनानींचा आशीर्वाद त्यांना या पदकाच्या रूपाने प्राप्त होणार आहे. - राजेंद्र दर्डा, एडिटर इन चीफ, लोकमत
प्रकृती आणि प्रगतीसाठी...नाशिक, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, पुणे या ठिकाणी महामॅरेथॉनला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर ठाण्यात आयोजन होत आहे. उद्या हजारो ठाणेकर धावणार आहेत. ठाणेकर आज प्रकृती आणि शहराच्या प्रगतीसाठी धावणार आहेत. आम्ही काही वर्षांपूर्वी महामॅरेथॉनचे एक छोटे स्वप्न पाहिले होते. त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता आजच्या महामॅरेथॉनची सकाळ ही सुंदर असणार आहे. - रुचिरा दर्डा, महामॅरेथॉनच्या फाउंडर