ठाणे : आमचे आशिर्वाद सगळ्यांना हवे असतात पण त्या समाजाला आम्ही नको असतो, अशी खंत पारलिंगी आणि दलित हक्क कार्यकर्त्या, कवयित्री, स्तंभलेखिका दिशा पिंकी शेख यांनी व्यक्त केली. जाती धर्मापलीकडे पारलिंगी (एलजीबीटीक्यूए) समाजातील एकमेकांना नाते म्हणून स्वीकारतो तर आमचे कुटुंब का स्वीकारत नाहीत असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
सतिश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या बिईंग मी या समितीच्यावतीने पारलिंगी समुदायाचा समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलवा यासाठी मंगळवारी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली होती. या परिषदेचे उद्घाटन ए.व्ही. रुम येथे करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे सचिव कमलेश प्रधान, सहसचिव मानसी प्रधान, प्राचार्य डॉ. गणेश भगुरे, उपप्राचार्य संज्योत देऊसकर आदी उपस्थित होते. दिशा यांनी पारलिंगी समाज समजून घेण्याची गरज असल्याची अपेक्षा यावेळी व्यक्त केली.
त्या पुढे म्हणाल्या, आमच्या केंद्रस्थानी पालकांनी उभे राहण्यापेक्षा पाठीमागे उभे राहीले तर पुढे होणारे आमचे शोषण थांबेल. आम्हाला काम करण्याचे सल्ले समाजाकडून दिले जातात पण आम्हाला कोण काम द्यायला तयार नाही. महिलेवर अत्याचार झाला आणि तृतीयपंथीवर झाला तर त्यासाठी तरतूद करण्यात आलेल्या शिक्षेतही तफावत आहे. असे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थितांसमोर मांडला. आमच्या समाजासाठी शैक्षणिक, आरोग्य, राजकीय धोरण नाही अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी पारलिंगी समाजाच्या आत्महत्त्या वाढत असून समाजाने त्याबाबतीत आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.