लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : एक देश, एक कर अशी घोषणा करत अंमलात आलेल्या वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीनंतरच्या पहिल्याच दिवशी बाजारपेठा, दुकाने, मॉल... अशी सर्व आघाड्यांवर शांतता होती. नेमके काय घडणार याची कल्पना नसल्याने काही दुकानांतील शिल्लक स्टॉकचे सेल सुरूच होते. पण त्यासाठी रोख रक्कम स्वीकारली जात होती. हॉटेलचालकांना मात्र दरवाढीमुळे ग्राहक घटण्याची भीती वाटते आहे, तर कपड्यांपासून दागिने विक्रेत्यांपर्यंत सर्वांनीच सावध पवित्रा घेत सणवार येईपर्यंत नवा स्टॉक भरणार नसल्याचे स्पष्ट केले.वेगवेगळ््या करांची जागा घेत आलेल्या जीएसटीनंतर ठाणे जिल्ह्याच्या विविध बाजारपेठांतील शुकशुकाट जाणवण्याजोगा होता. या कर प्रणालीबद्दल संभ्रम असल्याचे दिसून आले. इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, चपला यासारख्या दुकांनामध्ये स्टॉक क्लिअरिंग सेल सुरू होते. येत्या रपाच दिवसांत नेमके चित्र समोर येईल, अशी आशा दुकानदारांनी व्यक्त केली. हा कर लागू होण्यापूर्वी गेले पंधरवडाभर साधारण ५० टक्क्यांपर्यंत सलवत देणारे सेल सुरू होते. ज्या वस्तुंवर कर वाढले आहेत, त्या खरेदी करण्याकडे जसा कल होता, तशीच ज्या वस्तुंवर घसघशीत सवलत आहे, त्यांचीही खरेदी सुरू होती. त्यामुळे ग्राहकांची वाढलेली गर्दी गेल्या दोन-तीन दिवसांत शिगेला पोचली होती. मोबाइल, टिव्ही, फ्रिज, लॅपटॉपसह कपड्यांवर मेगासेल होते. पण १ जुलै उजाडला आणि झटक्यात ही दुकाने ओस पडली. अनेक ठिकाणी विकल्या गेलेल्या वस्तुंच्या पॅकिंगचे काम सुरू होते. सोन्या-चांद्या दुकानांनी तर मागण्या नोंदवणे काही काळ बंद केले आहे. मोठ्या दुकानांनी सर्व तयारी केली आहे, पण ग्राहकांचा पत्ता नव्हता. त्यामुळे पंधरवड्यानंतर बाजाराला मरगळ आल्याचे चित्र दिसत होते. सराफा बाजार ‘होल्ड’वरजीएसटीमुळे सराफा बाजारात सध्या खरेदी-विक्रीचा व्यवहार तसेच बुकिंगही बंद ठेवल्याचे सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्यांनी सांगितले. सध्या मजुरी, गोल्ड कार्डवर किती कर असतील याची माहिती आमच्याकडे नाही.त्यामुळे आम्हीही कोणत्या दागिन्यांची खरेदी करीत नाही किंवा बुकिंग करत नाही. आॅर्डर्स जरी घेतल्या, तरी जीएसटी लागू झाल्यानंतरचे दर लागतील, असे स्पष्ट सांगत असल्याचे सोन्या-चांदीचे व्यापारी हितेश जैन यांनी सांगितले. जीएसटीनंतर दागिन्यांचे दर वाढतील, असा समज बाळगणाऱ्या ग्राहकांनी दोन दिवसांपूर्वी सोन्या-चांदीच्या दुकानांत गर्दी केली होती. परंतु त्या ग्राहकांना परत पाठवल्याचे जैन यांनी सांगितले. सोन्या-चांदीच्या दुकानांत २ जुलैपासून व्यवहार सुरू होणार असल्याचे व्यापारी म्हणाले. ग्राहक खरेदीसाठी येत असले तरी व्यापाऱ्यांनी त्यांना ‘होल्ड’ वर ठेवले आहे. ‘आठवडाभर सेल असतील’सवलतीचा बॅनर लावल्यावर दोन दिवसांत ग्राहकांनी खरेदी केली. आम्ही ग्राहकांना एसएमएसद्वारे सवलतीची माहिती कळवल्याचे कपड्यांचे विक्रेते समीर वधान यांनी ‘लोकमत’ला सांगितले. अजून आठवडाभर सर्व दुकानांत सेल असेल. वेळ पडल्यास माल संपेपर्यंत सवलतीची मुदतही वाढण्याची शक्यता आहे. आता सण-उत्सवाच्या काळातच नवीन माल भरण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. जीएसटी क्रमांकासाठी बहुतांश व्यापाऱ्यांनी अर्ज दाखल केला असून तो लवकरच मिळेल, असे वधान यांनी सांगितले. नव्या स्टॉकची मागणी नाही!अनेक दुकानदारांनी नवा स्टॉक मागवलेला नसल्याने नेमकी दरवाढ स्पष्ट होत नव्हती. सध्या आहे तो स्टॉक पुढील पाच दिवसांत संपवायचा आणि आॅडिट करायचे त्यानंतरच जीएसटीचा विचार करायचा असा ट्रेंड व्यापाऱ्यांत आहे.पावसाळ््यात बऱ्याचदा सेल लावून जुना माल विकून टाकण्याकडे दुकानदारांचा कल असतो. फक्त तो सेल यंदा लवकर लागला.श्रावण-गणपतीच्या काळात सणवार सुरू झाले की मार्केट हळूहळू सावरू लागते. त्यामुळे तोवर साधारण दीड-दोन महिने तरी फारसा नवा स्टॉक मागवायचा नाही, असा व्यापाऱ्यांचा पवित्रा आहे. तोवर जीएसटीचे चित्र नेमकेपणाने स्पष्ट होईल.
सारे काही शांत शांत!
By admin | Published: July 02, 2017 6:12 AM