ठाणे : खोटे गुन्हे दाखल करणे, कटकारस्थान करणे आणि खंडणी उकळणे असे आरोप असलेले राज्याचे माजी पोलिस महासंचालक संजय पांडे यांची ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडून बुधवारी सुमारे तीन तास चौकशी करण्यात आली. सध्या याच गुन्ह्यात पांडे यांच्यासह अन्य सहा जणांना मुंबई उच्च न्यायालयाने ३ जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षणासाठी अंतरिम जामीन दिला आहे.
पांडे यांच्याविरुद्ध ठाण्यातील ठाणेनगर पोलिस ठाण्यात २६ ऑगस्ट २०२४ रोजी भाईंदरचे बांधकाम व्यावसायिक संजय पुनामिया यांनी गुन्हा दाखल केला. मुंबईचे तत्कालीन विशेष सरकारी वकील शेखर जगताप, निवृत्त सहायक पोलिस आयुक्त सरदार पाटील, गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक मनोहर पाटील, श्यामसुंदर अग्रवाल, शरद अग्रवाल आणि शुभम अग्रवाल या अन्य सहा जणांचा आरोपींमध्ये समावेश आहे. याच प्रकरणामध्ये ११ डिसेंबर २०२४ रोजी ठाणे गुन्हे शाखेच्या वागळे इस्टेट युनिटमध्ये चौकशीसाठी पांडे यांना पाचारण केले होते.
यावेळी सामान्य व्यक्तीप्रमाणे एका रिक्षाने दाखल झालेल्या पांडे यांची गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक सलील भोसले यांनी चौकशी केली. मे २०२१ ते ३० जून २०२४ या दरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये तत्कालीन पोलिस महासंचालक पांडे यांच्यासह इतर आरोपींनी छळ केल्याचा आरोप पुनामिया यांनी आपल्या तक्रारीमध्ये केला. ठाणे नगर पोलिस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याचा आरोपीने बेकायदेशीर तपास केला. फिर्यादी पुनामिया यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्यासह इतर व्यावसायिकांना खोट्या केसची अडकवण्याची धमकी देऊन पैसे उकळण्यात आले.
विशेष सरकारी वकिलाच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून न्यायालयाची दिशाभूलही करण्याचा प्रयत्न केला. याच प्रकरणी पुनामिया यांनी ऑगस्ट २०२४ रोजी ठाणेनगर पोलिस ठाण्यात ई-मेलद्वारे ही तक्रार दाखल केली होती. उपायुक्त जाधव यांच्यामार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांच्या चौकशीला पांडे यांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र, आपल्यावरील आरोपांचा इन्कार करीत, हे आरोप तथ्यहीन असल्याचे त्यांनी चौकशीमध्ये पोलिसांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.