मीरारोड - मीरारोडच्या कनकीया भागात महापालिका व पोलिसांच्या परवानगीनंतर शूटिंग सुरु असताना ते बंद पाडून सेट चे सामान स्वतःच्या ७११ क्लबच्या आवारात ठेवायला लावल्याने गुन्हा दाखल करण्याची तक्रार झाल्याने भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता पुन्हा वादात सापडले आहेत.
कनकिया येथील पार्क व्ह्यू हॉटेल ते तिवारी कॉलेजपर्यंतच्या महापालिकेच्या रस्त्यावर दूरचित्रवाहिनीच्या छायाचित्रणासाठी महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी परवानगी दिली होती. त्याचे शुल्क परवानगी घेणाऱ्या आर. के. ड्रीम्स यांनी भरलेले होते.
गुरुवारी पालिकेच्या रस्त्यावर शूटिंग सुरू असताना नरेंद्र मेहतांनी व त्यांच्या माणसांनी शूटिंग बंद पाडले. इतकेच नव्हे तर शूटिंगच्या सेटचे सामान सुद्धा बळजबरीने उचलून मेहतांच्या ७११ क्लबच्या आवारात नेऊन ठेवण्यात आले. त्यामुळे संबंधित कंपनीच्या रोहित गुप्ता सह छितरमल गुप्ता यांनी मीरारोड पोलिसांसह महापालिकेस मेहतां विरोधात गुन्हा दाखल करण्याची तक्रार दिली आहे. पोलीस घटनास्थळी गेल्यानंतर क्लबच्या आवारात ठेवलेले शुटिंगचे सामान परत करण्यात आले.
परवानगी असून सुद्धा मेहता हे त्यांना कोणताच अधिकार नसताना दमदाटी व गुंडगिरी करत शूटिंग बंद पडतात व सामान उचलून घेऊन जातात. या आधी सुद्धा मेहतांनी असा प्रकार केल्याबाबत तक्रारी पोलिसात दिल्या आहेत. पोलिसांनी व शासनाने गंभीर दाखल घेऊन तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही केली आहे. ह्या सर्व प्रकारच्या अनेक व्हिडीओ क्लिप सुद्धा पुरावा म्हणून देण्यात आल्या आहेत असे छितरमल गुप्ता म्हणाले. तर रात्री मेहतांची गाडी रस्त्यात आडवी लावून एकाबाजूला रस्ता बंद करण्याचा प्रकार सुद्धा पोलिसांना कळवला आहे असे त्यांनी सांगितले.
छितरमल गुप्ता यांनी दिल्लीच्या नेशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो कडे मेहतांवर दाखल गुन्ह्यांची माहिती देत कारवाईची मागणी केली आहे. त्याची दखल ब्युरो ने घेत राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे यांना कळवले. त्यानुसार राज्य गुन्हे अन्वेषण तांत्रिक सेवा विभागाचे पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया यांनी मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून मेहतांवर योग्य ती कारवाई करण्यास कळवले आहे. दरम्यान परवानगी असून सुद्धा शूटिंग बंद पाडण्याच्या प्रकारां बाबत मे महिन्यातच महापालिकेने सर्व पोलीस ठाण्याना शूटिंग वेळी धमकी देणारे वा पैशाची मागणी करणाऱ्यांवर योग्य कारवाई करण्याची पत्रे दिली होती.