ठाणे : बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त नंदकुमार जंत्रे यांना तपास पथकाने चौकशीला बोलावले आहे. मात्र, काही कारणास्तव लगेच येणे शक्य नसल्याने १६ नोव्हेंबरपर्यंत येण्याचे त्यांनी मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली.परमार यांनी ७ आॅक्टोबर रोजी आत्महत्या केल्यानंतर याप्रकरणी मुख्य संशयित असलेल्या चौघांचीही दररोज चौकशी केली जात आहे. त्यातूनच जंत्रे यांच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळात परमार यांच्या कोणत्या प्रकल्पांना परवानग्या दिल्या अथवा नाकारल्या गेल्या, तसेच या प्रकरणी नगरसेवकांनी कशाप्रकारे अडथळे आणले याबाबतची चौकशी त्यांच्याकडे केली जाणार आहे. त्याचसाठी सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप गोरे यांच्या पथकाकडून त्यांना बोलावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. आतापर्यंत इतर २४ जणांकडे चौकशी करण्यात आली. तर तिघांच्याही निवासस्थाने आणि कार्यालयांची झडती घेण्यात आली. यात सुधाकर चव्हाण यांच्या बंगल्यात विदेशी मद्याचा साठा सापडला. उर्वरित तिघांच्या घरात मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे मालमत्ता तसेच इतर चौकशी करण्यात येत आहे. मात्र, बऱ्याच प्रश्नांना आमच्या सीएशी बोलून सांगतो, अशी उत्तरे त्यांच्याकडून मिळत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. (प्रतिनिधी)
माजी पालिका आयुक्तांची चौकशी
By admin | Published: November 14, 2015 3:32 AM