भाईंदर: भाईंदर पश्चिमेस अरुंद रस्त्यामुळे कोंडी होत होती. ती फोडण्यासाठी रस्त्याचे रुंदीकरण केले. यासाठी तेथील बांधकामे पाडली. पण, रुंदीकरणाच्या नावाखाली मोकळ्या केलेल्या रस्त्याच्या जागेत सुशोभीकरणासाठी तब्बल आठ कोटी २२ लाखांच्या खर्चाचे बांधकाम सुरू करून रुंदीकरणाला महापालिकेने हरताळ फासला आहे.
भाईंदर पश्चिमेतील रेल्वेस्थानकाबाहेरील परिसर अतिशय अरुंद होता. त्यातच, वाढती लोकसंख्या व वाढत्या वाहनांमुळे या भागात नेहमीच कोंडी होते. या ठिकाणी मीरा-भार्इंदर महापालिका परिवहन उपक्रम, बेस्ट, एसटी महामंडळाच्या बस तसेच मोठ्या संख्येने रिक्षांची वर्दळ असते. शिवाय, दुचाकी व चारचाकींसह खाजगी बस मोठ्या संख्येने येतात. त्यात फेरीवाल्यांची भर पडली आहे. भाईंदर पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या जेसलपार्क येथील शहीद भगतसिंह भुयारी मार्गामुळे तर वाहतूककोंडी वाढली आहे. रेल्वे पुलावर चढताना वा उतरताना प्रवेशद्वारावरच रिक्षाचालकांचे अतिक्रमण असते.
रेल्वेस्थानक परिसरातील रस्ता रुंदीकरणासाठी पालिकेने येथील केंद्र सरकारच्या मीठ विभागाचे जुने बांधकाम व भिंत बळजबरीने तोडून टाकली. त्याविरोधात पालिकेच्या अधिकाऱ्यांवर सरकारने भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला आहे. याच भागात असणारी जुनी दुकाने व बार आदी महापालिकेने राजकीय दबावाखाली रीतसर कार्यवाही न करता बळजबरीने पाडले. त्यावेळी भाजपसह तत्कालीन आमदार नरेंद्र मेहता यांनी श्रेयही घेतले.
रुंदीकरण केलेल्या जागेत पालिकेने डांबरीकरण केले. परंतु, रुंदीकरण केलेल्या जागेत मेहतांच्या भाजपप्रणीत रिक्षा संघटनेचा फलक लागला व रिक्षातळही सुरू झाला. उर्वरित जागेत पुन्हा हातगाडीवाले बसू लागले तसेच रिक्षा उभ्या राहू लागल्या. आजही रिक्षा थेट रेल्वे पुलाच्या जिन्याच्या प्रवेशद्वारावरच लावल्या जातात.
१५ टक्के जास्त दराने निविदा मंजूर सुशोभीकरणाच्या कामासाठी रुणुजा देव कॉर्पोरेशनला हे कंत्राट दिले आहे. या कामाची अंदाजित रक्कम सात कोटी १५ लाख असताना पालिकेने तब्बल १५ टक्के जास्त दराने निविदा मंजूर केली आहे. म्हणजेच, हे काम तब्बल आठ कोटी २२ लाखांच्या घरात गेले आहे. १३ सप्टेंबर २०१९ ला पालिकेने कार्यादेश दिला असून कामाची मुदत सहा महिन्यांची आहे. म्हणजेच, १२ मार्चआधी काम पूर्ण करायचे आहे.