अंबरनाथ : अनेक वर्षांपासून अंबरनाथच्या डम्पिंग ग्राउंडवरील आगीमुळे नागरिक त्रस्त आहेत. नागरिकांना त्रास होत असतानाही पालिका प्रशासन या प्रकरणात योग्य कारवाई करताना दिसत नव्हते. दरम्यान, या डम्पिंगसंदर्भात वृत्तपत्रांत आलेल्या बातमीची दखल घेत राष्ट्रीय हरित लवादाच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या घनकचरा व्यवस्थापन समितीचे प्रमुख जे.पी. देवधर यांनी अंबरनाथच्या डम्पिंगला भेट दिली. या भेटीमुळे अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. यावेळी डम्पिंगवरील आग लागलीच आटोक्यात आणण्याचे आदेश निरीक्षकांनी दिले.
अंबरनाथ फॉरेस्टनाका येथील पालिकेचे डम्पिंग ग्राउंड हे नागरिकांसाठी त्रासदायक ठरते आहे. पालिका प्रशासन ओला आणि सुका कचरा वेगवेगळा केला जात असल्याचा दावा करत असले, तरी डम्पिंग ग्राउंडवर पडणारा कचरा आणि त्याचे प्रमाण पाहता शहरात कचºयावर प्रक्रिया केली जाते की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या दोन वर्षांत अंबरनाथच्या डम्पिंग ग्राउंडला आग लागण्याचे प्रमाण वाढलेले आहे. ही आग विझवण्यासाठी पालिकेकडून नियमित योग्य उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे हे डम्पिंग सातत्याने पेटलेलेच राहते आहे.
‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी डम्पिंग ग्राउंडची अवस्था झाल्याने पेटलेले डम्पिंग विझवण्यासाठी अधिकारी तेथे फिरकतदेखील नाहीत. डम्पिंगबाबतीत पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने या डम्पिंगचा त्रास ज्या नागरिकांना होतो, त्या नागरिकांनी पालिकेसमोर धरणे आंदोलनदेखील केले. मात्र, प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने नागरिकांची निराशा झाली आहे. आधीच हे डम्पिंग ग्राउंड अनधिकृत जागेत सुरू असून त्यावर योग्य उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिकांनी का त्रास सहन करावा, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
डम्पिंग प्रकरणात गेल्या १५ दिवसांत अनेक आंदोलने आणि निदर्शने झाल्याने त्या वृत्ताची दखल राष्ट्रीय हरित लवादाने घेतली आहे. हरित लवादाचे निरीक्षक आणि उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जे.पी. देवधर यांनी अंबरनाथला भेट दिली. या ठिकाणी नागरिकांना होणारा त्रास आणि पालिकेकडून केले जाणारे उपाययोजना यांची माहिती घेतली. डम्पिंग ग्राउंडची पाहणी करण्यासाठी आल्यावर देवधर यांना जागेवर पेटणारे डम्पिंग ग्राउंड दिसले. डम्पिंग पेटत असतानाही प्रशासन काहीच करत नाही, याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. पेटणारे डम्पिंग ग्राउंड विझवण्याचे आदेश देवधर यांनी सर्वात आधी पालिका प्रशासनाला दिले. सोबत, हे डम्पिंग पुन्हा पेटणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश दिले. यावेळी मुख्याधिकारी देविदास पवार आणि नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांनी डम्पिंग, कचरा नियोजनाबाबत देवधर यांना माहिती दिली.
पूर्वीची परिस्थिती आणि गेल्या दोन वर्षांत बदललेल्या परिस्थितीचा आढावा देण्यात आला. डम्पिंगची समस्या सोडवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. सोबत, अंबरनाथ पालिकेला डम्पिंग ग्राउंडसाठी देण्यात आलेल्या जागेची पाहणी करण्यात आली. तसेच ओला आणि सुका कचºयावर प्रक्रिया करणाºया यंत्रणेची माहिती देण्यात आली. शासनाने नुकताच मंजूर केलेल्या कचरा प्रकल्पाविषयी माहिती दिली. डम्पिंगची माहिती घेतल्यावर देवधर यांनी पालिका कार्यालयाला भेट दिली. कचराव्यवस्थापनासाठी पालिकास्तरावर सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती मुख्याधिकारी पवार यांनी दिली. पालिकेचे कचराव्यवस्थापनाबाबत सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत देवधर यांनी समाधान व्यक्त केले. मात्र, डम्पिंगबाबत पालिकेने गंभीर राहण्याचे आणि आग लागणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश दिले आहे.
हरित लवादाच्या निरीक्षकांनी डम्पिंगची पाहणी केल्यावर किमान आग लागण्याचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. गेली अनेक वर्षे नागरिकांना आश्वासने देत झुलवत ठेवणारे प्रशासन हरित लवादाच्या हस्तक्षेपानंतर तरी पालिकेच्या कामकाजात सुधारणा होणे अपेक्षित आहे.