मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या हद्दीतील वरसावे येथील सरकारी तलाव माफियांनी चोरल्याच्या आदिवासींसह श्रमजीवी संघटनेच्या तक्रारींवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या जिल्हाधिकारी आणि आयुक्त कार्यालयावर लोकमतमधून टीकेची झोड उठताच, रविवारची संधी साधून तलावचोरांनी पोकलेनच्या साहाय्याने खोदकाम करत तलाव जागेवरच असल्याचे दाखवण्यासाठी डबके खणले आहे.
भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांनी दोन दिवसांपूर्वीच तलाव चोरीला गेला नसून,ं त्याचे सुशोभीकरण केल्याचा दावा केला होता. मुळात तेथे तलावच नव्हता, असे सांगत विकास आराखड्यातही तलाव नसल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यांनी दाखवलेले फोटो हे दुसºयाच तलावाचे होते. मात्र, रविवारी तलावाचे खोदकाम सुरू केल्याने चोरांचे पितळ उघडे पडले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी श्रमजीवी संघटनेने केली आहे.वरसावेनाक्यावरील एक्स्प्रेस इन हॉटेलकडून जाणाºया रस्त्यावर मेहतांच्या ७११ हॉटेल्स कंपनीचे सी.एन.रॉक हॉटेल आहे. या भागातील जवळपास सर्वच जमीन ७११ हॉटेल्सच्या ताब्यात असून, याठिकाणी लागूनच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची हद्द आहे. त्यात डोंगर असून, पावसाळ्यात येणारे पाणी खाली खाजगी जागेत नैसर्गिकरीत्या साचून तिथे तलाव व पाणथळ झाले आहेत. वनहद्द असल्याने त्यालगतचा परिसरही इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये येतो.
वनहद्दीलगत सर्व्हे क्र. ९० मध्ये पूर्वीपासूनचे नैसर्गिक पाणथळ-तलाव होते. सातबाºयातही हा तलाव सरकारी असल्याची नोंद असून, त्याचे क्षेत्र सुमारे आठ हजार चौरस फूट इतके आहे. मेहतांच्या ७११ हॉटेल्स कंपनीने सातबारा नोंदी सरकारी तलाव असताना या जागेत भराव सुरू केला. एप्रिल २०१६ पासून आदिवासींसह श्रमजीवी संघटनेने सरकारी तलावात भराव केल्याची तक्रार मेहतांच्या नावानिशी त्यावेळी केली होती.पोलिसांसह तलाठ्यांनी केली पाहणीरविवारी हा सरकारी तलाव पोकलेनच्या साहाय्याने खोदण्यास सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत हे खोदकाम सुरू होते. पोकलेनने खोदकाम करून पुन्हा तलाव दाखवण्यासाठी डबके निर्माण केले गेले. त्यात पाणी भरून सभोवताली शोभेची रोपे ठेवण्यात आली. खोदलेली माती डम्परने भरून जवळच टाकण्यात आली. त्यामुळे सदर तलाव हा मेहतांच्या ७११ कंपनीने चोरल्याचा आमचा आरोप खरा ठरला असून, यात गुन्हे दाखल करण्याची आणि बेजबाबदार पालिका व अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांनाही सहआरोपी करण्याची मागणी श्रमजीवी संघटनेने केली आहे. मुळात सायंकाळनंतर खोदकाम व गौण खनिज वाहतूक करण्यास बंदी असूनही काम केले गेले. काशिमीरा पोलिसांनी घटनास्थळी रविवारी रात्री जाऊन पाहणी केली. त्यानंतर सोमवारी सकाळी तलाठी यांनी पाहणी केली. याआधी या भागात ७११ हॉटेल्स कंपनीने नैसर्गिक पाणतळ-तलावात मोठ्या प्रमाणात भराव करून त्यात बांधकामे केली. इको सेन्सेटिव्ह झोन असूनही डोंगर फोडला गेला. मोठमोठी झाडे मारण्यात आली. वनविभागाने पाहणी करून अहवाल दिला. इको सेन्सेटिव्ह झोन समितीतही याबाबत चर्चा झाली. पण, अद्याप याप्रकरणी गुन्हा दाखल केला नाही किंवा अन्य कोणतीही कारवाई केली गेली नाही.