- जितेंद्र कालेकर ठाणे - आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग आता अॅक्शन मोडवर आला आहे. बुधवारी एकाच दिवसात कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली ठाणे आणि मुंबईच्या ४० अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत गावठी दारुसह ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये दोघांना अटक केली आहे.
उपायुक्त प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्याचे अधीक्षक डॉ. निलेश सांगडे, मुंबई उपनगरचे अधीक्षक नितीन घुले यांच्यासह कल्याण, ठाणे आणि मुंबईतील उपअधीक्षक, निरीक्षक आणि दुय्यम निरीक्षक अशा तब्बल ४० अधिकाऱ्यांच्या चमूने २० मार्च २०२४ रोजी सकाळी ७ ते दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान खर्डी, दिवा खाडी परिसर, आलीमघर, सरळांबे, वाशाळा, अंजूर, छोटी देसाई, मोठी देसाई, आगासन, घेसर, द्वारली पाडा, माणेरागाव, कुंभार्ली, केवणी, कालवार, कारीवली, केशवसृष्टी आदी ३० ठिकाणी हे धाडसत्र राबवले. या धाडीमध्ये बेकायदेशीरपणे गावठी दारु निर्मिती आणि विक्रीचे ३० गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये २६ अड्डे बेवारस असल्याचे आढळले. यात दोघांना अटक केली असून दोघे फरार झाले. गावठी दारु निर्मितीसाठी लागणारे ८९ हजार ४८० लीटर रसायन, १०५ लीटर गावठी दारु असा ३३ लाख ९३ हजार १८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.