लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : शिवसेनेच्या आग्रही भूमिकेमुळे मीरा- भार्इंदरमधील सर्वच १२ मासळी बाजारातील महिला विक्रेत्यांची थकबाकी माफ करून महिना केवळ २० रुपये शुल्क आकारण्याचा ठराव महासभेने मंजूर केला. भाजपाने केवळ एकाच बाजाराचा विषय आणल्याने संतप्त उपमहापौरांनी एकच बाजाराचा विषय का आणलात? असा भेदभाव करु नका असे महापौरांना ठणकावले. मीरा- भार्इंदरमधील गावांमध्ये आधीपासूनच मासळी बाजार भरत असल्याने पालिकेने सुविधा पुरवल्या आहेत. परंतु बाजारात बसणाऱ्या स्थानिक आगरी, कोळी महिलांकडून मनमानीपणे कधी मालमत्ता कर तर कधी भाडे पालिकेने लावले. पालिके चे शुल्क अवास्तव असल्याने अनेक मासळी बाजारातील महिलांनी वेळोवेळी पालिकेकडे तक्रारी केल्या. २००८ मध्ये महासभेने ठराव करून मासळी विक्रेत्या महिलांना महिना २० रुपये भाडे आकारावे तसेच वीज, पाण्याचा खर्च मात्र मासळी विक्रेत्या करतील असा ठराव केला होता. २०१२ मध्ये मात्र महासभेने महिना ३०० रूपये शुल्क आकारण्याचा ठराव करून वीज, पाणी, साफसफाई आदी खर्च पालिकेनेच करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, खारीगावातील मासळी विक्रेत्या महिलांनी महासभेच्या ठरावानुसार ३०० रूपये महिन्या प्रमाणे पालिकेकडे भरले. परंतु त्यानंतरही पालिकेने वीज देयक न भरल्याने ३ ते ४ वेळा वीजपुरवठा खंडित केला. अखेर विक्रेत्या महिलांनीच मिळून वीजबिल भरले. दुसरीकडे पालिकेने या महिलांकडे ३०० रूपये भाडे भरण्याचा तगादा लावला. या प्रकरणी मासळी विक्रेत्यांनी नगरसेविका वंदना पाटील यांच्याकडे धाव घेतली. पाटील यांनी महापौर गीता जैन यांची भेट घेऊन मासळी विक्रेत्या महिलांचे शुल्क माफ करण्यास सांगितले. महापौरांनी महासभेसमोर विषय आणला असता उपमहापौर प्रवीण पाटील यांनी फक्त एकाच बाजाराचा विषय का आणला? सर्वच मासळी बाजारातील महिलांना त्यांची थकबाकी माफ करून केवळ २० रूपये महिना भाडे आकारण्याची भूमिका मांडली. दरम्यान, मीरा-भाईंदर पालिका निवडणूक डोळ््यासमोर ठेऊन निर्णय घेतला असल्याचे शहरात बोलले जात आहे.
मासळी बाजारातील विक्रेत्यांची थकबाकी माफ
By admin | Published: May 24, 2017 1:03 AM