लोकमत न्यूज नेटवर्क
टिटवाळा : शहरातील गणपती मंदिरालगतच्या जावई पाडा परिसरात एकाच वेळेला अनेक पक्षी व प्राणी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली होती. आजूबाजूच्या परिसरात उग्र दर्प येऊ लागल्याने येथील नागरिकांनी पाहणी केली असता त्यांना बाजूला असलेल्या झाडाझुडपात काही पक्षी आणि प्राणी मरून पडल्याचे आढळून आले. याबाबत प्राणिमित्र संघटनेला कळवल्यानंतर त्यांच्या तक्रारीवरून अनोळखी व्यक्तीविरोधात टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जावई पाडा परिसरात उग्र दर्प पसरल्याने येथील रहिवासी त्रस्त झाले होते. येथील नागरिकांनी आजूबाजूला पाहणी केली असता थारवानी रेसिडेन्सी कॉम्प्लेक्सच्या मागे असलेल्या झाडीतून उग्र वास येत असल्याची बाब उघडकीस आली. अधिक जवळ जाऊन पाहणी केली असता तेथे एकाच वेळी सात कुत्रे, पाच कावळे आणि काही कोंबड्या मरून पडल्याचे आढळून आले. या पक्ष्यांना व प्राणांना विषबाधा झाला असल्याचा अथवा कोणीतरी जाणीवपूर्वक अन्नातून विष दिले असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यानंतर परिसरातील नागरिकांनी डब्ल्यूएआरआर या प्राणिमित्र संस्थेला याबाबत माहिती दिली. प्राणिमित्र संस्थेच्या सदस्यांनी या ठिकाणी पाहणी करून या प्रकाराबाबत टिटवाळा पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलीस स्थानकात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अशोक कुडव करत आहेत.
--------------