जव्हार : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंतापद रिक्त असल्याने व प्रभारी कार्यकारी अभियतां कार्यालयात गेल्या सहा ते सात महिन्यांपासून बसत नसल्याने, विकास कामे ठप्प झाली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत विविध कामांची जुलै महिन्यात भरण्यात आलेली टेंडर्स अद्याप उघडण्यात आलेली नाहीत. अनेक कामांवर गदा आली आहे.आदिवासी विकास प्रकल्पातील ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेत विक्र मगड तालुक्यातील खुडेद गावातील समाज मंदिरचे बांधकाम न करताच १० लाख रूपये रक्कम काढण्यात आल्याचा गैरप्रकार घडला होता. या भ्रष्टाचारामुळे जव्हारचे कार्यकारी अभियंता, विक्रमगडचे शाखा अभियंता आणि आदिवासी विकास विभागाचे निरीक्षक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.तेव्हापासून जव्हारचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता- नितीन पालवे हे जव्हारच्या सार्वजनिक बांधकाम विभागात येत नसल्याने, बांधकाम विभागाची कामे ठप्पच झाली आहेत. जव्हार सां.बा. विभागाचे कार्यकारी अभियंता पालवे यांचा पदभार पालघरचे कार्यकारी अभियंता वसईकर यांच्याकडे देण्यात आला आहे. मात्र वसईकर हे जव्हारच्या कार्यालयाकडे फिरकत नसल्याने व महत्वाच्या कार्यालयीन कागदपत्रांवर सह्या करीत नसल्याने अनेक कामांत अडथळे येऊन विकासकामे ठप्पच झाली आहे. गेल्या सहा महिन्यात सादर झालेल्या निविदा पडून असल्याने सारा कारभार ठप्प झाला आहे. तसेच ज्यांची कामे पूर्ण झाली त्यांची बिलेही या काळात न निघाल्याने ठेकेदारांचे दिवाळे निघाले आहे. (वार्ताहर)
कार्यकारी अभियंत्याविना सा. बांधकाम विभाग ठप्प
By admin | Published: January 06, 2017 6:03 AM