मीरारोड - मीरा भाईंदर शहराच्या नागरिकांना जाचक ठरलेल्या दहिसर टोलनाकाच्या टोल वसुलीतून दिलासा देण्यासाठी एम.एच.-०४ पासिंगच्या वाहनांना टोल मधून माफी देण्याची विनंती आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन केली आहे.
मुंबईत प्रवेश करणाऱ्या करणाऱ्या पाच नाक्यांवर पथकर वसुलीचे कंत्राट एम.ई.पी. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला १९ नोव्हेंबर २०२६ पर्यंत २१०० कोटी रुपयांना दिले आहे. २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात टोलनाके पुर्ण बंद करावयाचे असल्यास ठेकेदार कंपनीला एकरकमी २४९४.२७ कोटी किंवा पाच टप्प्यांमध्ये ३३०१.०२ कोटी रूपयांची भरपाई देण्या बाबत चर्चा होती. त्याला आता तीन वर्ष उलटून गेल्यामुळे ती रक्कम सुद्धा कमी होईलच शिवाय पूर्वी पेक्षा तिपटीने वाहने वाढल्याने ठेकेदार कंपनीची टोल वसुली जवळपास पुर्ण झाल्याची शक्यता आहे.
तसेच या ठेकेदार कंपनीने अटी व शर्ती नुसार स्वच्छता गृह , रुग्णवाहिका आदी सुविधाच लोकांना दिली नाही . टोल नाक्यावर पिवळी पट्टी मारली नाही जेणे करून त्याच्या बाहेर वाहनांची रांग लागल्यास वाहने सोडली पाहिजेत . उलट मूळ टोल नाका सोडून रस्त्यात अडथळे टाकून नव्याने टोल वसुलीचे केबिन उभारले आहेत . केंद्र व राज्य सरकारच्या टोल धोरणा नुसार लगतच्या भागातील नागरिकांना टोल सवलत ठेकेदार देत नाही.
दहिसर टोल नाका येथून रोज हजारो गाड्या ये - जा करत असून ठेकेदाराच्या नियोजनशूय कारभारा मुळे तासन तास वाहतूक कोंडी होत आहे . यातून प्रचंड ध्वनी व वायू प्रदूषण होऊन इंधन व वेळ वाया जात आहे. त्यामुळे या नाक्यावरून एम. एच. ०४ पासींग वाहनांना टोलमाफी देण्यात यावी . मीरा भाईंदरच्या नागरिकांना तात्काळ दिलासा देण्या बाबतचे आदेश देऊन दिवाळीची सुवर्ण भेट द्यावी अशी विनंती आ . सरनाईक यांनी मुख्यमंत्री यांना केली आहे.