नितिन पंडीतभिवंडी ( दि. ९ ) जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून भिवंडी तहसीलदार कार्यलय प्रांगणात कृषी विभागा तर्फे महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत नोंदणी असलेल्या महिला बचतगटांच्या पुढाकाराने रानभाज्या प्रदर्शन व विक्री कार्यक्रमांचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते.
शहरात राहणाऱ्या नागरिकांना पावसाळ्यात जंगलात उगवणाऱ्या खास रान भाज्यांची ओळख नसल्याने या पौष्टिक भाज्या खाणे टाळल्या जात असतात.या रान भाज्यांची ओळख सर्वांना व्हावी या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या रान भाज्या प्रदर्शन व विक्री स्टॉल ठिकाणी करटोली, खुरासणी,अळूची पाने ,कुर्डु ,आधाडा ,बाफळी ,काटे माठ ,पेंढरु ,कवदर ,भारंगी अशा विविध रानभाज्या विक्री साठी ठेवण्यात आल्या होत्या.
तालुक्यातील विविध महिला बचत गटांच्या माध्यमातून या रान भाज्या विक्री साठी प्रदर्शन ठेवण्यात आले होते.विशेष म्हणजे या सर्व रान भाज्या जंगलात सेंद्रिय खतावर उगवलेल्या असून या भाज्यांची आरोग्य विषयक वैशिष्ट्य सुद्धा नागरीकांना सांगितली जात होती. त्या माध्यमातून या भाज्यांची काही वेळातच हातोहात विक्री झाली . या रानभाज्या प्रदर्शन व विक्री स्टॉल चे उद्घाटन भिवंडी पंचायत समिती सभापती रवी पाटील व तहसीलदार अधिक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी गणेश बांबळे, कृषी मंडळ अधिकारी दयावंती कदम,कृषी पर्यवेक्षक किशोर गायकवाड, कुरकुरे,प्रदीप निकम,विवेक दोंदे, व गुजर पंचायत समिती उपसभापती गजानन असवारे, व आदी मान्यवर उपस्थित होते.