अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : धनुष्यबाण हा साधासुधा नसून तो बाळासाहेब ठाकरे आणि प्रभू श्रीरामाचा धनुष्यबाण आहे. तो टिकलाच पाहिजे, नाशिक मतदार संघ हा शिवसेनेला मानणार आहे. आजपर्यंत शिवसेनेचे खासदार निवडून आले आहेत. तेही लाखो मतांनी त्यामुळे धनुष्यबाण नाशिकमध्ये टिकलाच पाहिजे. उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेची एकमेव सीट आहे. नाहीतर एवढा हट्ट धरण्याची आवश्यकता नव्हती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघे निश्चित समजून घेतील असा विश्वास व्यक्त करत ही सीट शिवसेनेची असल्याने आम्ही आग्रही आहोत. आजही आणि उद्याही आग्रही असणार असल्याचे शिंदे सेनेचे नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी सांगितले.
चैत्र नवरात्रोत्सवाला दरवर्षी येतो. मागच्या वर्षी देखील नगरसेवकांना घेऊन आलो होतो.असे बोरस्ते यांनी शुक्रवारी देवीचा आशीर्वाद घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. नाशिक लोकसभा मतदार संघ शिवसेनेला मानणारा आहे. त्यामुळे आज होणाऱ्या भेटीत आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी ही जागा शिवसेनेसाठी कशी महत्त्वाची आहे. यासंदर्भात सांगणार आहोत. पुढील निर्णय हा सर्वस्वी मुख्यमंत्री यांचा असेल. तसेच उत्तर महाराष्ट्राचे शिवसेनेचे अस्तित्व या जागेवर अवलंबून आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महायुतीचा धर्म आम्ही पाळणार आहोत. हेमंत गोडसे किंवा छगन भुजबळ यांच्याबरोबर संबंध चांगले आहेत. त्यामुळे कोणी असेल तरी मोदींना पंतप्रधान करणे महत्त्वाचे आहे असे त्यांनी सांगितले.