मुंब्रा : निकृष्ट दर्जाच्या दुरुस्तीविषयी वेळोवेळी केलेल्या तक्र ारींकडे दुर्लक्ष केल्याने मुंब्रा बायपासवर पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर भले मोठे भगदाड पडल्याची घटना रविवारी दुपारी घडली. यामुळे सदर मार्गिकेवरील वाहतूक बाजूच्याच मार्गिकेवर वळवली असून यामुळे वाहतूककोंडी होऊ लागली आहे.
मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे २०१८ मध्ये हा रस्ता पाच महिन्यांसाठी वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला होता. त्यानंतर १३ महिन्यांपूर्वी दुरु स्तीचे काम अपूर्ण असतानाही तो वाहतुकीसाठी खुला केला होता. दुरु स्तीवर करोडो रु पये खर्च केल्यानंतरही अल्पावधीतच यावर्षीच्या पावसाळ्याच्या सुरुवातीला येथील रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याचे तसेच रस्यावरचे सिमेंट वाहून स्टील उघडे पडल्याचे निदर्शनास आले होते.
याबाबतची तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागातील संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेकदा करण्यात आली होती. परंतु, संबंधितांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे या रस्त्यावर भगदाड पडले असल्याची माहिती मुंब्रा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश लंभाते तसेच मुंब्रा प्रभाग समितीचे कार्यकारी अभियंता धनंजय गोसावी यांनी लोकमतला दिली. दरम्यान, भगदाड पडलेल्या ठिकाणी अपघात होऊ नये, यासाठी त्याच्या आजूबाजूला बॅरिकेड्स लावले आहेत. यामुळे त्याठिकाणी वाहनांची वर्दळ धीमी होऊन वाहतूककोंडी होऊ लागली आहे.