लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोरोनाच्या विषाणूचे वेगाने होणारे संक्र मण आणि प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यभरातील नागरिकांना प्रशासनाकडून घरी थांबण्याचे निर्देश दिले आहेत. अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही बाहेर पडू नये, असेही आवाहन केले. तरीही शहरातील विविध भागांमध्ये सोमवारी नागरिक बाहेर पडले होते. त्यामुळे कोणीही अत्यावश्यक कारणाशिवाय, बाहेर पडल्यास कठोर कारवाई करावी लागेल, असा इशारा ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिला आहे.संपूर्ण देशभरात २२ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर ‘जनता कर्फ्यू’ चे आवाहन केले होते. या आवाहनाला ठाणेकरांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानंतर रविवारी रात्री ९ ते सोमवारी पहाटे ५ वाजेपर्यंत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात संचारबंदी लागू केली होती. ही संचारबंदी शिथिल होताच सकाळी ७ ते १० वाजण्याच्या सुमारास अनेकजण घराबाहेर पडले. अनेकांनी केवळ बाहेर काय चाललय? कलम १४४ म्हणजे नेमकी काय असते? हे अजमविण्यासाठी किंवा कोणत्या ना कोणत्या बहाण्याने दुचाकी किंवा आपल्या खासगी मोटार कारने बाहेर पडले.कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी सहकार्य केले नाही तर त्यांना घरी बसविण्यासाठी पुढचे पाऊल उचलावे लागेल. अगदीच नाईलाज झाला तर कायदेशीर कारवाई करावी लागेल, असा इशाराही फणसळकर यांनी दिला आहे.राज्यात कलम १४४ लागू केलेले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरातच राहण्याचे आवाहन पोलिसांकडून वारंवार करण्यात येत आहे. तरीही सोमवारी सकाळी लोकमान्यनगर, शास्त्रीनगर, मानपाडा, घोडबंदर रोड, कळवा आणि मुंब्रा या भागात नागरिक विनाकारण घराबाहेर पडल्याचे चित्र होते. त्याचवेळी ठाण्यातून मुंबईत प्रवेश करण्याच्या मुलूंड चेक नाक्यावरही सकाळी वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. ठाण्यातूनही बाहेर पडलेल्या वाहन चालकांकडे मुंबई पोलिसांनी चौकशी सुरु केली. त्यामुळे सकाळी ९ ते १० वाजण्याच्या सुमारास आनंदनगर चेक नाका येथे वाहनांची मोठी गर्दी झाली होती. ठाणे पोलिसांनीही या वाहतूक कोंडीची दखल घेत त्याठिकाणी कारवाई केली. त्यानंतर ही वाहतूक कोंडी कमी झाली.* अनेक ठिकाणी नागरिक वेगवेगळया धार्मिक ठिकाणी प्रार्थनेसाठी एकत्र येत आहेत. मनाई आदेश तसेच संचारबंदी असूनही या आदेशाचे पालन केले जात नाही. त्यामुळे या प्रार्थनास्थळांवर पूजारी, मौलाना आणि धर्मगुरु यांच्याव्यतिरिक्त सामान्य नागरिकांना जाण्यास बंदी केली आहे.* खासगी वाहनांच्या वापरावर बंदीरेल्वे, एसटी आणि सार्वजनिक बस सेवा बंद असल्यामुळे अनेक नागरिक हे विनाकारण खासगी वाहनांचा वापर करीत आहेत. यात फरक पडला नाहीतर अशा वाहनांच्या वापरावरही पूर्णपणे बंदी केली जाणार असल्याचे फणसळकर यांनी सांगितले.