ठाणे, घोडबंदर : ठाणे महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून अद्यापही मतदारयाद्यांचा घोळ सुरू असल्याची बाब समोर आली आहे. मतदारयाद्यांचा कधी नव्हे, असा घोळ झाल्याच्या प्रतिक्रिया उमेदवारांकडून दिल्या जात आहेत. २१ जानेवारीला प्रसिद्ध होणारी यादी उमेदवारांच्या हातात पडण्यास एक आठवडा उशीर झाला. तसेच केंद्रनिहाय मतदारयाद्या ८ जानेवारीला मिळणार होत्या, त्यादेखील वेळेत तयार झाल्या नाहीत. तोच, निवडणूक आयोगाच्या नवीन सूचना आल्या आहेत की, प्रत्येक मतदान केंद्रावर होणारे मतदान एक क्र मांकापासून सुरू करावे. त्यामुळे पुन्हा निवडणूक विभाग कामाला लागला असून आता या याद्या हाती पडेपर्यंत उमेदवारांना मतदारांकडे देण्यात येणाऱ्या मतदार स्लीपचेही काम लांबणीवर पडणार असून या घोळामुळे यापूर्वीच्या मतदारयाद्यांवर झालेला खर्च पाण्यात गेला आहे. निवडणूक विभागाकडून आजही निवडणुकीच्या कामात घोळ सुरू आहे. मतदारयाद्या बनवताना आणि त्यांची प्रभागांनुसार फोड करताना काही चुका झाल्यामुळे त्या सुधारताना निवडणूक विभागाला मोठी डोकेदुखी झाली आहे. आजही अशा तक्रारी घेऊन अनेक जण ठाणे महापालिकेत घिरट्या घालत आहेत. एका प्रभागातील मतदार दुसऱ्या प्रभागात आणि दुसऱ्या प्रभागातील मतदार भलत्याच प्रभागात आढळून आल्याने उमेदवार चिंतेत आहेत. तक्र ार करूनही त्यात सुधारणा झाली नसल्याने काही उमेदवारांनी हक्काचे मतदार गमावले आहेत. विकत घेतलेल्या मतदारयाद्यांनुसार मतदारांची ओळखपरेड सुरू केली असताना त्यांना त्यांचे मतदान केंद्र आणि मतदार क्रमांक समजावून सांगितले जात असताना पुन्हा नव्याने केंद्र क्र मांक आणि मतदार क्रमांक सांगावा लागणार आहे. आधीच चार प्रभागांत फिरताना उमेदवारांची दमछाक होत असताना निवडणूक आयोगाच्या नव्या सूचनांमुळे उमेदवार टेन्शनमध्ये आले आहेत. या याद्या कधी मिळणार आणि आम्ही कधी स्लीप तयार करून वाटणार, असा सवाल सर्वांना पडला आहे. (प्रतिनिधी)
मतदारयाद्यांवरील उमेदवारांचा खर्च पाण्यात
By admin | Published: February 14, 2017 2:53 AM